Top News

जळगावात आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा

जळगाव विमानतळ परिसर ‘नो फ्लाईंग झोन’ घोषित, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आदेश जारी

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवार, दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून जळगाव शहरातील एका नियोजित कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने संभाव्य धोका लक्षात घेता जळगाव शहरातील कार्यक्रमस्थळ तसेच जळगाव विमानतळ परिसर ‘नो फ्लाईंग झोन’ घोषित करण्यात आला आहे.

अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून हा आदेश निर्गमित केला आहे. त्यानुसार गुरुवार, दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजेपासून दुपारी ४.०० वाजेपर्यंत जळगाव विमानतळ परिसर तसेच जळगाव शहरातील उपमुख्यमंत्री यांच्या नियोजित कार्यक्रमाच्या आसपासच्या परिसरात ड्रोन, रिमोट कंट्रोल एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, हॉट एअर बलून अथवा तत्सम कोणत्याही उडणाऱ्या यंत्रणांचा वापर व प्रवेश यावर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे.

हा आदेश भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ (१)(३) नुसार एकतर्फी पद्धतीने निर्गमित करण्यात आला असून संबंधित कालावधीत कोणतीही व्यक्ती किंवा संस्था या आदेशाचे उल्लंघन करीत असल्याचे आढळल्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम २२१ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांच्या सुरक्षेला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे. नागरिकांनी तसेच संबंधित संस्था व ड्रोन चालकांनी या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने