जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ मध्ये महायुतीच्या उमेदवारांनी प्रचाराचा वेग लक्षणीयरीत्या वाढवला असून, थेट जनसंपर्कावर विशेष भर दिला जात आहे. गाडगे बाबा चौक आणि मोहन नगर परिसरात काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महायुतीचे उमेदवार प्रफुल देवकर यांच्यासह सर्व उमेदवारांनी दौलत नगर, रामनगर तसेच गाडगे बाबा चौक परिसरात घरोघरी भेटी देत मतदारांशी संवाद साधला. या वेळी उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि परिसराच्या विकासासंदर्भातील मुद्दे जाणून घेतले. तसेच महायुतीकडून राबविण्यात येणाऱ्या विकासात्मक योजनांची माहिती देत भविष्यातील विकासाचा आराखडा नागरिकांसमोर मांडण्यात आला.
प्रचार दौऱ्यादरम्यान अनेक ठिकाणी महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून पुष्पहार अर्पण करत पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. ज्येष्ठ नागरिकांनी उमेदवारांना शुभेच्छा देत आशीर्वाद दिले. तरुण वर्गानेही प्रचार फेरीत उत्साहाने सहभाग घेतला. या सर्व प्रतिसादामुळे परिसरात सकारात्मक आणि उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांशी थेट संवाद साधल्याने मतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार होत असून, महायुतीच्या प्रचाराला अधिक बळ मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आगामी काळातही अशाच पद्धतीने जनसंपर्क वाढवून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे उमेदवारांनी यावेळी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा