जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ ची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून प्रभाग क्रमांक १ मधून अपक्ष उमेदवार चेतन सुरेश महाले यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. शिव शंकर कॉलनीतील हनुमान मंदिरात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून ढोल-ताशांच्या गजरात प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
प्रचाराच्या पहिल्याच दिवशी चेतन महाले यांनी शिव शंकर कॉलनी, सिद्धी विनायक पार्क, हरी ओम नगर परिसरात नागरिक, मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांसह झंझावाती पदयात्रा काढली. ढोल-ताशांच्या कडकडाटात निघालेल्या या पदयात्रेमुळे संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. अनेक ठिकाणी महिलांनी उमेदवाराचे औक्षण करत पेढा भरवून विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
विकासासाठी ‘छत्री’ चिन्हाला मतदानाचे आवाहन
यावेळी अपक्ष उमेदवार चेतन सुरेश महाले यांनी नागरिकांशी संवाद साधत, “छत्री या चिन्हासमोरील बटण दाबून विकासाला साथ द्या,” असे आवाहन मतदारांना केले. प्रचाराचा वेग कायम राखत मंगळवारीदेखील प्रभागातील विविध भागात प्रचार केला जाणार असल्याची माहिती प्रचार प्रमुखांनी दिली.
जळगाव महानगरपालिकेसाठी गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. प्रभागातील प्रलंबित प्रश्न, मूलभूत सुविधा आणि विकासाच्या मुद्द्यांमुळे यंदा निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळत आहे.
टिप्पणी पोस्ट करा