जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रयत्नात एटीएममधील लाखो रुपयांच्या नोटांना आग लागून मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सदर एटीएममध्ये सुमारे ११ लाख रुपयांची रोकड होती; मात्र त्यातील नेमकी किती रक्कम आगीत जळाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना जळगाव–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील औद्योगिक वसाहत परिसरात, जकात नाक्याजवळ असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये शनिवारी घडली. चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन कापून त्यातील रोकड लंपास करण्याचा डाव आखला होता. मशीनचा मोठा भाग कापण्यात आला; मात्र कटरच्या उष्णतेमुळे आत ठेवलेल्या नोटांना अचानक आग लागली. एटीएममध्ये धूर पसरू लागताच घाबरून चोरटे घटनास्थळावरून पळून गेले.
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार हा प्रकार आंतरराज्य चोरी करणाऱ्या टोळीचा असू शकतो. त्या दृष्टीने तपास सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा माग काढण्याचे काम सुरू आहे.
मोटारीतून आले होते चोरटे
सीसीटीव्ही चित्रणात चार जण एका मोटारीतून येऊन एटीएम फोडण्याचा प्रयत्न करताना दिसून आले आहेत. चोरीपूर्वी त्यांनी एटीएमवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे फवारून तो निष्क्रिय करण्याचा प्रयत्न केला होता. सामान्यतः अशा प्रकारची छेडछाड होताच पोलीस ठाणे व बँकेच्या नियंत्रण कक्षाला तात्काळ सूचना मिळते. मात्र या एटीएमची सुरक्षा यंत्रणा कार्यरत नसल्याने कोणताही अलर्ट गेला नसावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.
दरम्यान, एटीएममधून धूर निघत असल्याचे एका रिक्षाचालकाच्या लक्षात आले. त्याने तत्काळ एटीएमजवळ लावलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस व अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
नुकसानीचा आकडा अद्याप अस्पष्ट
या एटीएममध्ये रोकड भरण्याची जबाबदारी एका खासगी कंपनीकडे देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच या एटीएममध्ये सुमारे ११ लाख रुपयांची रोकड जमा करण्यात आली होती. मात्र घटनेनंतर नेमकी किती रक्कम जळाली किंवा नुकसान झाले, याबाबत अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही.
ग्राहकांनी केलेले व्यवहार, रोख भरण्याच्या नोंदी तसेच प्रणालीतील आकडेवारीची सखोल पडताळणी केल्यानंतरच नुकसानीचा अचूक आकडा समोर येईल, असे संबंधित कंपनीकडून सांगण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली जाणार असून, त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा