Top News

ग्रीन सिटी फाउंडेशन व सेंट टेरेसा स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I पर्यावरणाचे संतुलन राखणे व वाढत्या प्रदूषणावर मात करण्याच्या उदात्त हेतूने ग्रीन सिटी फाउंडेशन, जळगाव आणि सेंट टेरेसा स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या परिसरात भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसह उपस्थित मान्यवरांच्या सहभागामुळे अत्यंत प्रेरणादायी ठरला.

या वृक्षारोपण मोहिमेत सावली देणारी व पर्यावरणासाठी उपयुक्त अशी विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने कडुनिंब, पिंपळ, चिंच आणि गुलमोहर या झाडांचा समावेश होता. केवळ वृक्षारोपणावर न थांबता, लावलेल्या रोपांचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी सेंट टेरेसा शाळेच्या स्काऊट आणि गाईडच्या विद्यार्थ्यांनी तसेच पर्यावरणप्रेमींनी स्वीकारली आहे.

या कार्यक्रमास ग्रीन सिटी फाउंडेशनचे पदाधिकारी डॉ. धनंजय बेंद्रे, आनंद मराठे, ललित मल्हारा, सुनील भिरूड, हेमंत विसपुते, लेफ्ट शिवराज पाटील, बंटी बुटवानी, सुरेंद्र वाणी, वसंत पाटील, मयूर खोंडे, श्री व सौ. डॉ. रेखा महाजन, श्री अनिल भोकरे, सुमित देशमुख, सतीश देशमुख, जयेश लापसिया, शैलेश पंडित, श्री जैन, एस. जे. पाटील, निनाद पाटील, सुनील अग्रवाल, देवा ढेकळे, ॲड. केतन ढाके यांच्यासह सेंट टेरेसा स्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर जुलीट, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पर्यावरणाचा संदेश
यावेळी ग्रीन सिटी फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वृक्षांचे महत्त्व स्पष्ट केले. “आज लावलेले एक रोप उद्याच्या पिढीला शुद्ध हवा, सावली आणि सुरक्षित भविष्य देणार आहे,” असे त्यांनी सांगून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबतची जाणीव अधिक दृढ केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जुलीट यांनी ग्रीन सिटी फाउंडेशनचे मनापासून आभार मानले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या वाढदिवसानिमित्त किमान एक तरी झाड लावण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. अशा छोट्या उपक्रमांतून मोठा बदल घडू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हा वृक्षारोपण कार्यक्रम पर्यावरण संरक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, सामाजिक जबाबदारी व शाश्वत विकासाची जाणीव निर्माण करणारा ठरला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने