Top News

भुसावळात पोलिसांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या इराणी टोळीविरोधात मोठी कारवाई; 40.25 लाखांचे सोने, 16 दुचाकी व शस्त्रसाठा जप्त

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I भुसावळ शहरात पोलिसांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या इराणी टोळीविरोधात जळगाव पोलिसांनी राबविलेल्या व्यापक कोम्बिंग ऑपरेशनमध्ये मोठे घबाड हाती लागले आहे. या कारवाईत तब्बल 40 लाख 25 हजार रुपये किमतीचे सोने, 16 मोटारसायकली, एक गावठी पिस्तूल, मॅगझीनसह दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही माहिती जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

मध्य प्रदेशातील बडोद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयित करारअली हुजूर अली याला अटक करण्यासाठी मध्य प्रदेश पोलिसांचे पथक भुसावळात दाखल झाले होते. भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या मदतीने हे पथक मुस्लिम कॉलनी परिसरात आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेले असता, तेथे जमावाने पोलिसांवर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात छतावरून दगड-विटा फेकण्यात आल्या, दांडक्यांनी मारहाण करण्यात आली, तर काही महिलांनी पोलिसांना पकडून चावा घेण्यापर्यंत धक्कादायक प्रकार घडले. या गोंधळाचा फायदा घेत संशयित आरोपी पसार झाला होता. या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलली. 

या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार भुसावळ शहर व परिसरात व्यापक कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या कारवाईदरम्यान एका घरात मोठ्या प्रमाणात सोन्याच्या लगडी आढळून आल्या. चौकशीदरम्यान मरीयम बी. जाफर अली जाफरी व नाजीया टिपू शेख यांनी सदर सोन्याच्या लगडी आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी एकूण 16 सोन्याच्या लगडी जप्त केल्या असून त्यांचे एकूण वजन 287.7 ग्रॅम आहे. या सोन्याची अंदाजे किंमत 40 लाख 25 हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याच कारवाईत मजहर अब्बास जाफर इराणी (वय 19) याच्याकडून एक गावठी पिस्तूल, मॅगझीन व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्याच्याविरोधात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी एकूण 16 मोटारसायकली जप्त केल्या असून त्यांची किंमत सुमारे 4 लाख 80 हजार रुपये आहे. यातील एक मोटारसायकल मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. या टोळीचा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या तब्बल 16 हून अधिक गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. तसेच ही टोळी आंतरराज्य स्वरूपाची असल्याची दाट शक्यता असून, या प्रकरणाचा तपास अधिक सखोल पद्धतीने सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सांगितले. पोलिसांवर हल्ला करून कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने