Top News

जळगावात नवनिर्वाचित नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी

विजयाच्या रागातून भररस्त्यात अश्लील शिवीगाळ; जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवल्याच्या रागातून एका नवनिर्वाचित नगरसेवकाला भररस्त्यात अडवून अश्लील शिवीगाळ करत “तुझ्या रक्ताची होळी करू” अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी विष्णू रामदास भंगाळे (वय ५५, रा. ओंकार नगर, जळगाव) हे १६ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या जळगाव महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी, १७ जानेवारी रोजी मध्यरात्री सुमारे १२.०५ वाजता भंगाळे हे त्यांचे सहकारी वसंत सोनवणे व सागर पाटील यांच्यासह घराशेजारील प्लॉटजवळ उभे असताना हा प्रकार घडला.

यावेळी संशयित आरोपी प्रशांत चौधरी आणि त्याच्यासोबत असलेला एक अनोळखी इसम मोटारसायकलवरून घटनास्थळी आले. “आमचा उमेदवार निवडणुकीत पडला” या कारणावरून संशयितांनी भंगाळे यांना उद्देशून अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर “तुला बघून घेतो, तुझ्या रक्ताची होळी करू” अशी गंभीर धमकी देत दोघेही तेथून पसार झाले.

या घटनेनंतर विष्णू भंगाळे यांनी तात्काळ जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी प्रशांत चौधरी व त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस नाईक राजेश पदमर हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
निवडणूक निकालानंतर शहरात राजकीय तणाव वाढल्याचे चित्र असून, या घटनेमुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने