जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीला सुरुवातीपासूनच चांगले यश मिळताना दिसत आहे. महायुतीमधील भाजपने खाते उघडल्यानंतर आता आणखी एक जागा बिनविरोध झाली असून प्रभाग क्रमांक ७ क मधून आमदार राजूमामा भोळे यांचे चिरंजीव विशाल भोळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यामुळे भाजपच्या बिनविरोध जागांचा आकडा दोनवर पोहोचला असून, महायुतीच्या एकूण पाच ते सहा जागा आतापर्यंत बिनविरोध झाल्या आहेत.
भाजपची दुसरी बिनविरोध जागा
जळगाव महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून याआधी प्रभागातून उज्ज्वला बेंडाळे यांची बुधवारी बिनविरोध निवड निश्चित झाली होती. त्यानंतर आता विशाल भोळे यांची निवड बिनविरोध झाल्याने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीच्या माध्यमातून विशाल भोळे यांनी राजकारणात पहिले पाऊल टाकले असून, त्यांच्या बिनविरोध निवडीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या जागाही बिनविरोध
दरम्यान, गुरुवारी शिवसेना शिंदे गटाच्या तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या.
* प्रभाग क्रमांक १८-अ मधून आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे
* प्रभाग क्रमांक ९-अ मधून मनोज चौधरी
* प्रभाग क्रमांक ९-ब मधून प्रतिभा देशमुख
याशिवाय आज प्रभाग क्रमांक १९-अ मधून रेखा चुडामण पाटील यांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
महायुतीला सुरुवातीपासूनच आघाडी
भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या या बिनविरोध निवडींमुळे जळगाव महापालिकेत महायुतीची स्थिती अधिक मजबूत झाली आहे. निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीलाच मोठ्या संख्येने जागा बिनविरोध झाल्याने महायुतीला स्पष्ट आघाडी मिळाल्याचे चित्र आहे. आगामी निवडणूक लढतींसाठीही याचा सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा