Top News

मेहरूण येथील प्रभाग १९ ‘अ’ मधून शिवसेनेच्या रेखा पाटील बिनविरोध

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत माघारीच्या दुसऱ्या व अंतिम दिवशी मेहरूण परिसरातील प्रभाग क्रमांक १९ ‘अ’ मध्ये मोठा राजकीय बदल घडून आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांच्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला असून रेखा चुडामण पाटील या आता या प्रभागातून बिनविरोध निवडून येणे निश्चित झाले आहे.

शुक्रवार, दिनांक २ जानेवारी रोजी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांच्या उमेदवार सरला सुनील सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरीत्या मागे घेतला. याआधीच गुरुवारी या प्रभागातील दोन अपक्ष उमेदवार पूजा गणेश पाटील आणि सुजाता सतीश चौधरी यांनी माघार घेतल्यामुळे निवडणूक रिंगणात केवळ शिवसेनेच्या रेखा पाटील याच शिल्लक राहिल्या होत्या. परिणामी त्या बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर झाले.

दरम्यान, जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आतापर्यंत महायुतीचे एकूण पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक आणि शिवसेनेचे चार उमेदवार यांचा समावेश आहे. भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे यांनी प्रभाग क्रमांक १२ ‘ब’ मधून सर्वप्रथम बिनविरोध विजयाची नोंद केली. त्यानंतर माघारीच्या पहिल्या दिवशी शिवसेनेचे मनोज सुरेश चौधरी, प्रतिभा गजानन देशमुख आणि डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे हे उमेदवार बिनविरोध निश्चित झाले होते.

प्रभाग क्रमांक १९ ‘अ’ मधील रेखा चुडामण पाटील यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा होताच त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला. फटाक्यांची आतषबाजी करत आणि घोषणाबाजी करत समर्थकांनी जल्लोष साजरा केला. स्थानिक पातळीवर शिवसेनेसाठी हा विजय महत्त्वाचा मानला जात असून महायुतीची ताकद वाढल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पुढील टप्प्यांकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून उर्वरित प्रभागांतील लढती रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने