उमेदवारांनी माघार घेताच विजय निश्चित; गुलाबराव पाटील – चंद्रकांत सोनवणे यांची रणनीती ठरली निर्णायक
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक १९ ‘ब’ मधून शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार विक्रांत (गणेश) सोनवणे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यांच्या विरोधात उभे असलेले तीनही अपक्ष उमेदवारांनी अखेर माघार घेतल्याने हा विजय निर्विवाद ठरला आहे.
या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, पक्षाच्या संघटनशक्तीचे स्पष्ट दर्शन घडले आहे. विशेष म्हणजे या विजयामागे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चंद्रकांत सोनवणे यांची अचूक रणनीती निर्णायक ठरली आहे. दोघांनीही केलेल्या राजकीय हालचालींमुळे विरोधकांना मैदानातून माघार घ्यावी लागली.
बिनविरोध निवड झाल्याची घोषणा होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. फटाके फोडून आणि घोषणा देत शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला. निवडणूक न होता थेट प्रतिनिधी मिळाल्याने स्थानिक नागरिकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.
अलीकडच्या काळात शिवसेनेने विविध प्रभागांमध्ये बिनविरोध विजयाची मालिका कायम ठेवली असून, ही केवळ निवडणूक जिंकण्याची नव्हे तर संघटनात्मक ताकदीची स्पष्ट झलक मानली जात आहे. प्रभाग १९ ‘ब’ मधील निकालामुळे आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेचा आत्मविश्वास अधिक बळावला आहे.
एकूणच, विक्रांत सोनवणे यांच्या बिनविरोध विजयाने शिवसेना (शिंदे गट) ची शहरातील पकड अधिक मजबूत झाली असून, पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील ही यशस्वी रणनीती आगामी राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकणारी ठरणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा