जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I मानव तस्करी विरोधी पथक (एएचटीयू) व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने खेडी शिवारातील हनुमान नगर परिसरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर धाड टाकत धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. या कारवाईत देहविक्रीसाठी डांबून ठेवलेल्या एका अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली असून कुंटणखाना चालविणाऱ्या विजय सखाराम तायडे (वय ३२, रा. हनुमान नगर, खेडी शिवार) याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई दि. २३ रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय तायडे याने सहा महिन्यांपूर्वी हनुमान नगर परिसरात एक घर भाडेतत्त्वावर घेतले होते. या घरात तो एका अल्पवयीन मुलीला डांबून ठेवून कुंटणखाना चालवत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे मानव तस्करी विरोधी पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे संयुक्त पथक तयार करण्यात आले.
दि. २३ रोजी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास पथकाने डमी ग्राहक पाठवून सापळा रचला. डमी ग्राहकाने मिसकॉल दिल्यानंतर तत्काळ कारवाई करत पथकाने संबंधित घरावर छापा टाकला. छाप्यात घरातून अल्पवयीन मुलीसह विजय तायडे याला ताब्यात घेण्यात आले.
पीडित मुलीची चौकशी केली असता, आरोपी तायडे याने तिला घरात डांबून ठेवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे समोर आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोक्सो कायद्याच्या कलमांची भर घालण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, विजय तायडे याच्याविरुद्ध यापूर्वीही कुंटणखाना चालविणे व वेश्या व्यवसाय करवून घेतल्याप्रकरणी तब्बल तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. या धाडसी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांकडून पोलिसांच्या कार्यवाहीचे कौतुक होत आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मानव तस्करी विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, एलसीबीचे उपनिरीक्षक शरद बागल, सहायक फौजदार अतुल वंजारी, संजय हिवरकर, पोहेकॉ नितीन बाविस्कर, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, विजय पाटील, किशोर पाटील, राहुल रगडे, रविंद्र कापडणे, रविंद्र पाटील, रविंद्र गायकवाड, अनिल पाटील तसेच महिला कर्मचारी निलीमा सुशीर, भुषण कोल्हे, वहिदा तडवी, राहुल वानखेडे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
टिप्पणी पोस्ट करा