Top News

जळगाव महापालिकेत राजूमामा भोळेंच्या नेतृत्वाखाली ४६ पैकी ४६ जागांवर विजय

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आमदार सुरेश भोळे यांचे कौतुक 

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश संपादन करत इतिहास घडवला आहे. आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने महापालिकेच्या सर्वच्या सर्व ४६ जागांवर निर्विवाद विजय मिळवला असून, विरोधकांना एकही जागा मिळवता आलेली नाही. या दणदणीत यशानंतर आमदार भोळे यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.

निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीपासूनच भाजपने आक्रमक आणि नियोजनबद्ध भूमिका घेतली होती. आमदार राजूमामा भोळे यांनी स्वतः संपूर्ण निवडणूक रणनीतीची जबाबदारी सांभाळत ‘विकास’ आणि ‘पारदर्शक प्रशासन’ या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून मतदारांशी थेट संवाद साधला. त्यांच्या नेतृत्वावर मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाचे प्रतिबिंब निकालात स्पष्टपणे दिसून आले. भाजपच्या या घवघवीत विजयामुळे जळगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

या ऐतिहासिक विजयाची माहिती देण्यासाठी तसेच आगामी विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी आमदार भोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देत आमदार भोळे यांचा विशेष सत्कार केला आणि त्यांच्या उत्कृष्ट निवडणूक नियोजनाचे व नेतृत्वगुणांचे कौतुक केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले की, जळगावच्या जनतेने भाजपवर जो प्रचंड विश्वास दाखवला आहे, तो सार्थ ठरवण्याची जबाबदारी आमची आहे. आमदार राजूमामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य सरकार पूर्ण ताकदीने सहकार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, या विजयावर बोलताना आमदार राजूमामा भोळे म्हणाले की, हा विजय कोण्या एका व्यक्तीचा नसून जळगावमधील प्रत्येक कार्यकर्ता आणि नागरिकाचा आहे. केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचवल्यामुळेच हे यश मिळाले आहे. आगामी काळात जळगाव शहराचा विकास, पायाभूत सुविधा आणि नागरिकांचे जीवनमान उंचावणे हेच आमचे एकमेव ध्येय असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने