Top News

प्रभाग १३ ‘ड’ मध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ‘जितू भाऊंचा आवाज’ घरोघरी गुंजतोय

ढोल-ताशांच्या गजरात जितेंद्र मराठे यांच्या प्रचाराचा शुभारंभ; थेट नागरिकांशी संवाद साधत विश्वासाचा सेतू मजबूत

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I 
जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ ‘ड’ मध्ये अपक्ष उमेदवार जितेंद्र भगवानराव मराठे उर्फ जितू भाऊ यांच्या प्रचाराला नागरिकांचा मोठा व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांच्या मनात ‘जितू भाऊंचा आवाज’ गुंजत असून, प्रभागात परिवर्तनाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
आजच्या प्रचार रूटमध्ये नूतन वर्ष कॉलनी, रवींद्र नगर, शारदा कॉलनी, श्रीनगर, चैत्रबन कॉलनी, महाबळ येथील स्टेट बँक परिसर, रामदास स्वामी मंदिर परिसर, आनंद नगर तसेच आदर्श नगर या भागांचा समावेश होता. ढोल-ताशांच्या गजरात, कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत प्रचाराची सुरुवात करण्यात आली.
प्रचारादरम्यान जितेंद्र मराठे यांनी थेट घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्त्यांची अवस्था, ड्रेनेज, आरोग्य, स्वच्छता व मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी आपले अनुभव मोकळेपणाने मांडले. यावेळी जितेंद्र मराठे यांनी प्रत्येक प्रश्न गांभीर्याने ऐकून, प्रभागाचा सर्वांगीण विकास हा आपला प्राधान्यक्रम असल्याचे स्पष्ट केले.
नागरिकांच्या प्रतिक्रिया देखील बोलक्या ठरल्या.
एका ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले, “जितू भाऊ हे आमच्यातीलच आहेत. सुख-दुःखात ते कायम सोबत उभे राहिले आहेत. म्हणूनच आम्हाला त्यांनाच नगरसेवक म्हणून पाहायचे आहे.”

तर एका महिला नागरिकांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, “फक्त आश्वासन देणारा नव्हे, तर काम करून दाखवणारा उमेदवार आम्हाला हवा आहे, व तो म्हणजे जितेंद्र मराठे.”

तरुण वर्गातही उत्साह दिसून आला. “प्रभागात नवे विचार व प्रामाणिक नेतृत्व गरजेचे आहे. जितू भाऊंमध्ये ते दिसते,” अशी भावना तरुणांनी व्यक्त केली.

एकूणच, प्रभाग १३ ‘ड’ मध्ये जितेंद्र भगवानराव मराठे यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस बळ मिळत असून, नगरसेवक म्हणून ‘जितू भाऊंनाच पाहायचे’ हीच भावना नागरिकांतून प्रकर्षाने व्यक्त होत आहे, असे नागरिकांनी जळगाव अपडेट न्यूजशी बोलताना स्पष्ट केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने