तीन जागांवर शिवसेना, एका जागेवर भाजप विजयी; शहरात जल्लोषाचे वातावरण
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने आपला वरचष्मा कायम राखत एकामागून एक बिनविरोध विजय मिळवले आहेत. गुरुवारी दिवसभरात घडलेल्या राजकीय हालचालींनंतर महायुतीचे तब्बल चार उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, यामध्ये शिवसेना (शिंदे गट)चे तीन तर भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार समाविष्ट आहे. प्रभाग क्रमांक ९ ‘ब’ मधून प्रतिभा देशमुख यांची बिनविरोध निवड निश्चित झाल्याने महायुतीचा ‘चौकार’ पूर्ण झाला आहे.
निवडणूक रणधुमाळीत गुरुवारी सकाळी सर्वप्रथम प्रभाग १८ ‘अ’ मधून शिवसेना आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे पुत्र डॉ. गौरव सोनवणे यांची बिनविरोध निवड जाहीर झाली. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे डॉ. सोनवणे यांचा विजय निर्विवाद ठरला.
यानंतर दुपारी प्रभाग ९ ‘अ’ मधून शिवसेनेचे उमेदवार मनोज चौधरी यांच्या विरोधातील एकमेव अपक्ष उमेदवाराने माघार घेतली. त्यामुळे मनोज चौधरी यांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली.
विजयाची मालिका पुढे सुरू ठेवत प्रभाग ९ ‘ब’ मधून अपक्ष उमेदवार प्रतिभा पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेच्या प्रतिभा देशमुख यांचा मार्ग मोकळा झाला आणि त्या बिनविरोध निवडून आल्या.
याआधी बुधवारी प्रभाग १२ ‘ब’ मधून भाजपच्या माजी महानगराध्यक्षा उज्ज्वला मोहन बेंडाळे यांची बिनविरोध निवड जाहीर झाली होती.
सलग चार जागांवर मिळालेल्या या यशामुळे महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, विशेषतः शिवसेना शिंदे गटाने तीन जागा पटकावत आपली ताकद दाखवून दिली आहे. शहरभर कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला असून, आगामी निवडणूक लढतींसाठी महायुतीचा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे.
टिप्पणी पोस्ट करा