मयूर सोनवणे यांनी उमेदवारी माघार घेतल्याने मार्ग मोकळा; शिवसेनेचा मनोबल उंचावले
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I महानगरपालिका निवडणुकीत बिनविरोध निवडींची मालिका सुरूच असून, अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून प्रभाग क्रमांक १८ ‘अ’ मधून शिवसेनेचे उमेदवार गौरव चंद्रकांत सोनवणे हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा होताच महानगरपालिका परिसरात शिवसैनिकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला.
याआधी भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे या बिनविरोध निवडून आल्यानंतर आता शिवसेनेलाही या प्रभागात बिनविरोध यश मिळाले आहे. प्रभाग १८ ‘अ’ मधील निवडणूक प्रक्रियेत प्रतिस्पर्धी उमेदवार मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने गौरव सोनवणे यांचा विजय निश्चित झाला.
गौरव चंद्रकांत सोनवणे हे चोपडा मतदारसंघाचे विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे सुपुत्र असून, त्यांनी सामाजिक व आरोग्य क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे प्रभागात वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामान्य नागरिकांशी असलेला त्यांचा थेट संपर्क, सामाजिक उपक्रमांतील सक्रिय सहभाग आणि तरुणांमध्ये असलेली लोकप्रियता यामुळे त्यांना मोठे पाठबळ मिळाले.
अनुसूचित जमाती प्रवर्गातून झालेल्या या बिनविरोध निवडीमुळे शिवसेनेचे मनोबल अधिकच वाढले असून, आगामी महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीत ही निवडणूक महत्त्वाची ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. एकूणच, प्रभाग १८ ‘अ’ मधील ही बिनविरोध निवड शिवसेनेसाठी मोठे यश मानले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा