पाच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल; पोलिसांचा तातडीचा शिरकाव
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील के सेक्टरमध्ये असलेल्या साई किसान ठिबक निर्मिती कंपनीला बुधवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण कंपनीला आपल्या विळख्यात घेतले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ५ बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, कंपनीत कोणत्या कारणामुळे आग लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र प्लास्टिक साहित्य, ठिबक पाइपिंगचे कच्चे माल व उत्पादन सामग्री मोठ्या प्रमाणावर असल्याने आग चटकन पसरल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. परिसरातील नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दल आणि पोलिसांचा संयुक्त प्रयत्न सुरू आहे.
कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात असून सुदैवाने अद्याप मनुष्यहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. आगीचे नेमके कारण व नुकसानाचा तपशील पुढील चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा