Top News

किनगावच्या दिशाचा राष्ट्रीय विजय! खेलो इंडिया स्पर्धेत सलग दुसरे सुवर्णपदक

सलग दुसऱ्या वर्षी ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’मध्ये सुवर्णपदकाची शानदार कमाई

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I यावल तालुक्यातील किनगावची गौरवगाथा पुन्हा एकदा देशभरात दुमदुमली आहे. संभाजी ब्रिगेडचे जळगाव जिल्हाध्यक्ष शिवश्री विजय पाटील यांच्या सुकन्या दिशा विजय पाटील हिने खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सलग दुसऱ्या वर्षी सुवर्णपदक मिळवत अभिमानाचा मानाचा तुरा उंचावला आहे. तिच्या या ऐतिहासिक विजयाची बातमी कळताच आज सकाळी जळगाव रेल्वे स्टेशनवर विजयी दिशाचे भव्य स्वागत करण्यात आले.

मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष शिवश्री सुरेंद्र पाटील, विभागीय अध्यक्ष शिवश्री रामदादा पवार, ज्येष्ठ मार्गदर्शक शिवश्री सुरेशभाऊसो पाटील, मधुकरकाका पाटील, जिल्हाध्यक्ष शिवश्री इंजी. हिरामण चव्हाण, कार्यकारिणी सदस्य शिवश्री संदीप सोनवणे सर, शिवश्री पंकज गरुड सर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दिशाला शाल, पुष्पगुच्छ व ग्रंथ देऊन मोठ्या उत्साहात अभिनंदन करण्यात आले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा मान अभिमान अधिक उंचावणारी कामगिरी करत, दिशाने विद्यापीठाला ’खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’मध्ये सुवर्ण पदकाची श्रीमंती प्राप्त करून दिली आहे.

भरतपूर, राजस्थान येथे २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान आयोजित खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये ६३ किलो वजनी गटातील बॉक्सिंगच्या अंतिम सामन्यात दिशाने हरियाणाच्या प्रतिस्पर्धीवर ५-० असा एकतर्फी आणि दमदार विजय मिळवला. उत्कृष्ट तंत्र, जिद्द व लढाऊ वृत्तीच्या जोरावर दिशाने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदकावर नाव कोरले आहे.

दिशाच्या या सुवर्णमय यशामुळे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाबरोबरच खानदेश आणि जळगाव जिल्ह्याचे तसेच यावल तालुक्यातील किनगावचे नाव राष्ट्रीय स्तरावर झळकले आहे. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ व स्थानिक पातळीवरील अनेक संघटनांचा मान अभिमान उंचावत दिशाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या भव्य विजयाबद्दल दिशा विजय पाटीलवर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने