जळगावातील नेहरूनगरातील धक्कादायक घटना; कुटुंबावर दुःखाचा डोंगर
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
जळगाव शहरातील नेहरू नगर परिसरातील एका तरुण हॉटेल व्यावसायिकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.१०) दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. मृत तरुणाचे नाव शुभम रविंद्र मराठे (वय २५) असे आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शुभमचा परिवार नेहरू नगरमध्ये दीर्घकाळापासून वास्तव्यास आहे. त्याचे वडील रविंद्र मराठे हे मोहाडी रोडवर हॉटेल व्यवसाय करतात. शुभम हा हॉटेल व्यवसायात वडिलांना हातभार लावत होता.
कुटुंबाचे ह्रदयद्रावक दुःख
बुधवारी दुपारी शुभमच्या घरी कोणीही नसताना त्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याचे उघडकीस आले. माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
शुभमच्या मृत्यूची वार्ता कळताच कुटुंबीयांनी रुग्णालयात आक्रोश केला. परिसरात शोककळा पसरली. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, काका , काकू असा एकत्र परिवार होता.
आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट
शुभमने असे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. कुटुंबीय आणि परिचित यांनाही याचे कारण कळू शकलेले नाही.
एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
उद्या अंत्ययात्रा
जळगाव शहरातील नेहरू नगर येथील शुभम रविंद्र मराठे (जाधव) (वय २५) याचे बुधवार, दि. १० डिसेंबर २०२५ रोजी अकस्मात दुःखद निधन झाले. ते रविंद्र गणपत मराठे यांचे ज्येष्ठ सुपुत्र तसेच संजय मराठे, विनोद मराठे यांचे पुतणे होत. त्यांची अंत्ययात्रा गुरुवार, दि. ११ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता राहत्या घरी नेहरू नगर येथून निघेल. अंत्यसंस्कार नेरी नाका वैकुंठधाम येथे पार पडतील. शोकाकुल परिवारात आई–वडील, भाऊ–बहिणी तसेच नातेवाईकांचा समावेश आहे.
टिप्पणी पोस्ट करा