Top News

जनता त्रस्त, पदभार आरोग्य अधिकारी मस्त!, चेंबर भरून वाहतेय, अधिकारी बेपत्ता; अस्वच्छतेचा कहर


जळगावातील इंद्रनील सोसायटीतील मैल्याच्या टाकीचा प्रश्न तीन दिवसांपासून अर्ज देऊनही कामे प्रलंबित; तक्रार असूनही कारवाई नाही; पदभार आरोग्य अधिकारी उदय पाटील यांचा फोनही बंद

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहरातील निमखेडी शिवार येथील इंद्रनील सोसायटी (मयूर हौसिंग सोसायटी परिसर, गट नं. १०६/१) मध्ये मैल्याची (शौचालय) टाकी भरून वाहत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या संदर्भात सोसायटीतील रहिवासी पारसकर यांनी तब्बल तीन दिवसांपूर्वी टाकी खाली करण्यासाठी संबंधित विभागाकडे अर्ज दिला असतानाही अद्याप सफाईची गाडी पोहोचलेली नाही. परिणामी चेंबरमधून मैला बाहेर येत असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत आहे.

सोसायटीतील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वेळेत टाकी खाली न केल्यास परिसरात अस्वच्छता वाढून साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः लहान मुले, वृद्ध व आजारी व्यक्ती यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. “जर आजूबाजूच्या रहिवाशांना काही आजार झाला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल संतप्त नागरिक उपस्थित करत आहेत.

या गंभीर परिस्थितीबाबत पदभार आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, दोन वेळा मोबाईलवर कॉल करूनही त्यांनी कॉल रिसिव्ह केला नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याशी संबंधित तक्रारींवर तातडीने कारवाई होणे अपेक्षित असताना, तीन दिवसांपासून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने प्रशासनाचा ढिसाळपणा स्पष्ट होत आहे. वेळेत कारवाई न झाल्यास नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन मैल्याची टाकी खाली करण्याची प्रक्रिया सुरू करावी, परिसरात फवारणी करून दुर्गंधी व रोगप्रसार रोखावा, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी जोरदार मागणी इंद्रनील सोसायटीतील नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने