Top News

मोठी बातमी I गोलाणी मार्केट हल्ला प्रकरणाला भीषण वळण! १८ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू; शहर हादरले

हवालदाराच्या धाडसाने हल्लेखोर अटकेत, मात्र साईचा जीव वाचू शकला नाही

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I 
शहरातील गजबजलेल्या गोलाणी मार्केट परिसरात बुधवारी दुपारी घडलेल्या थरारक चाकूहल्ला प्रकरणात जखमी झालेल्या १८ वर्षीय तरुणाचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मृत तरुणाचे नाव साई गणेश बोराडे (वय १८, रा. शंकरराव नगर, जळगाव) असे आहे. तो देवकर महाविद्यालयात डिप्लोमाचे शिक्षण घेत होता. जुन्या वादातून शुभम रवींद्र सोनवणे (वय २५, रा. चौगुले प्लॉट, जळगाव) याने भरदुपारी साईवर चाकूने सपासप वार केले होते.

भरदिवसा थरार… बाजारपेठेत रक्तपात
बुधवारी दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास साई बोराडे गोलाणी मार्केट परिसरात असताना आरोपी शुभमने त्याला अडवले. यापूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून शुभमने अचानक चाकू काढत साईच्या पोटावर व शरीराच्या इतर भागावर गंभीर वार केले. एकच आरडाओरड झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

खाकी वर्दीतील देवदूत ठरले हवालदार रमेश चौधरी
याचवेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे हवालदार रमेश बाबुलाल चौधरी हे वैयक्तिक कामानिमित्त त्या परिसरात उपस्थित होते. त्यांनी प्रसंगावधान राखत जीवाची पर्वा न करता हल्लेखोरावर झडप घातली व त्याला जागीच पकडले. त्यांच्या धाडसामुळे पुढील हल्ला थांबला, मात्र तोपर्यंत साई गंभीर जखमी झाला होता.

जखमी साईला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही साईचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सागर शिंपी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. आरोपी शुभम सोनवणे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.

शहरात संतापाची लाट
भरदिवसा, वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. एका होतकरू तरुणाचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने