जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विजयाचा श्रीगणेशा केला असून प्रभाग क्रमांक १२ ब मधून भाजपच्या माजी महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई मोहन बेंडाळे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. जितेंद्र कुंवर यांनी केली.
प्रभाग क्रमांक १२ मध्ये महायुतीअंतर्गत भाजपला चारही जागा मिळाल्या आहेत. त्यामध्ये –
▪️ १२-अ : अनिल अडकमोल
▪️ १२-ब : उज्वलाताई मोहन बेंडाळे
▪️ १२-क : गायत्री इंद्रजीत राणे
▪️ १२-ड : नितीन मनोहर बरडे
यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
बुधवारी (दि. ३१ डिसेंबर) महानगरपालिकेत दिवसभर उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. या छाननीदरम्यान प्रभाग क्रमांक १२ ब मध्ये वैशाली निवृत्ती पाटील यांनी भारतीय जनता पक्षाकडून तीन अर्ज दाखल केल्याचे समोर आले. मात्र एका उमेदवाराला एकाच प्रभागात एकापेक्षा अधिक अर्ज भरता येत नसल्याने तसेच भाजपकडून त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेला नसल्याने, तसेच वेळेच्या तांत्रिक कारणामुळे त्यांचे १२ ब व १२ ड मधील अर्ज बाद ठरविण्यात आले.
त्यामुळे प्रभाग क्रमांक १२ ब मध्ये उज्वलाताई बेंडाळे या एकमेव उमेदवार राहिल्या असून त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. कुंवर यांनी केली.
दरम्यान, वैशाली निवृत्ती पाटील यांचा प्रभाग क्रमांक १२ क मधील अर्ज वैध ठरला असून त्या अपक्ष म्हणून भाजपच्या गायत्री राणे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत.
उज्वलाताई बेंडाळे यांच्या बिनविरोध निवडीमुळे प्रभाग क्रमांक १२ मध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, विजयाचा आनंद साजरा करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा