Top News

ब्रेकींग I जळगावसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा; आजपासून आचारसंहिता लागू

१५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल; महानगरांमध्ये राजकीय रणधुमाळीला सुरुवात

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगावसह राज्यातील महापालिका निवडणुकांचा बहुप्रतिक्षित कार्यक्रम अखेर जाहीर झाला असून, यामुळे राज्यातील प्रमुख महानगरांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित पत्रकार परिषदेत राज्यातील तब्बल २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली. यासोबतच संबंधित महापालिका क्षेत्रांमध्ये आजपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. त्यांनी प्रारंभी मतदार याद्या, प्रशासनाची तयारी आणि निवडणूक व्यवस्थापनाचा आढावा सादर केला. यानंतर त्यांनी निवडणुकीच्या वेळापत्रकाची अधिकृत घोषणा केली.

राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांचा निकाल न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडला असल्याने महापालिका निवडणुका कधी जाहीर होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आजच्या घोषणेमुळे तो संभ्रम दूर झाला असून, महानगरांतील राजकीय चित्र स्पष्ट होऊ लागले आहे.

२९ पैकी २७ महापालिकांची मुदत संपलेली

निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, राज्यातील २९ महापालिकांपैकी २७ महापालिकांची मुदत संपलेली आहे. त्यामुळे या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत.

बृहन्मुंबई महापालिकेत एक प्रभाग – एक नगरसेवक अशी रचना असणार असून मतदारांना एकच मत द्यावे लागणार आहे. तर उर्वरित २८ महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू राहणार असून, काही ठिकाणी तीन तर काही ठिकाणी चार नगरसेवक निवडले जाणार आहेत.

ईव्हीएमद्वारे मतदान, ऑफलाईन अर्ज सुविधा
या सर्व महापालिका निवडणुका ईव्हीएमच्या माध्यमातून घेतल्या जाणार आहेत. उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशन अर्ज सादर करण्याची सुविधा देण्यात आली आहे. निवडून आलेल्या उमेदवारांना सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे.

निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार असून, संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर स्टार चिन्ह देण्यात आले असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली. विशेष बाब म्हणजे, मतदानाच्या ४८ तास आधी प्रचार पूर्णपणे बंद राहणार आहे.

२,८६९ नगरसेवकांसाठी निवडणूक
या निवडणुकीत राज्यातील २९ महापालिकांमधील एकूण २,८६९ नगरसेवकांसाठी मतदान होणार आहे. सर्व संबंधित महापालिका क्षेत्रांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून, प्रशासनाला तत्काळ अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत.

महापालिका निवडणूक कार्यक्रम

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार —

नामनिर्देशन अर्ज दाखल : २३ ते ३० डिसेंबर २०२५

अर्जांची छाननी : ३१ डिसेंबर २०२५

अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत : २ जानेवारी २०२६

चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी : ३ जानेवारी २०२६

मतदान : १५ जानेवारी २०२६

मतमोजणी व निकाल : १६ जानेवारी २०२६

या घोषणेमुळे जळगावसह राज्यातील सर्व प्रमुख महानगरांमध्ये राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग येणार असून, आगामी काही आठवडे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीने गाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने