जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव तालुक्यातील निमखेडी येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली असून, रविवारी (दि. १४ डिसेंबर) रात्री साडेदहाच्या सुमारास सागर साहेबराव सोनवणे (वय २७) या तरुणाची धारदार शस्त्राने डोक्यात वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मारेकऱ्यांनी सागर सोनवणे याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याला गंभीर जखमी अवस्थेत निमखेडी गावातील राममंदिराजवळ फेकून दिल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी तातडीने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर सागरला मयत घोषित केले.
मृत सागर सोनवणे याच्या पश्चात आई-वडील व एक लहान भाऊ असा परिवार आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी, प्राथमिक तपासात अनैतिक संबंधातूनच ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या खून प्रकरणी तालुका पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, अन्य संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपास वेगाने सुरू असून, लवकरच या खुनाचा उलगडा होईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा