Top News

अजिंठा चौफुलीवरील वाहतूक कोंडीवर मनसे आक्रमक; आंदोलनाचा इशारा

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील अतिव्यस्त आणि महत्त्वाचा असलेला अजिंठा चौफुली ते अयोध्या नगर मार्गावरील गंभीर वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने अयोध्या नगर परिसरातील नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, त्यावर तातडीने तोडगा काढण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही मनसेने दिला आहे.

अजिंठा चौफुली हा जळगाव शहरातील प्रमुख चौक असून येथून सातत्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या चौकावरूनच अयोध्या नगरकडे जाणारा एकमेव मार्ग असल्याने सुमारे ३० ते ४० हजार लोकसंख्येच्या परिसरातील नागरिकांना अनेकदा रॉंग साईडने सिग्नल ओलांडावा लागतो. परिणामी येथे वारंवार लहान-मोठे अपघात घडत असून वाहतूक कोंडी ही नित्याची समस्या बनली आहे.

या मार्गावरून शाळा, महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, नोकरी-व्यवसायासाठी शहरात जाणारे नागरिक, तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. समोरून येणाऱ्या जड वाहनांमुळे प्रवास अधिकच धोकादायक ठरत असून अपघाताची भीती कायम असल्याचे मनसेने नमूद केले आहे.

आरोग्यविषयक आपत्कालीन प्रसंगात रुग्णवाहिका, अंत्यविधीसाठी जाणारी वाहने तसेच दैनंदिन कामांसाठी शहरात ये-जा करणे वाहतूक कोंडीमुळे अत्यंत कठीण झाले आहे. अजिंठा चौफुली ते एमआयडीसीकडे जाण्यासाठी असलेला सर्व्हिस रोड दोन्ही बाजूंनी ये-जा करण्यासाठी महत्त्वाचा असतानाही, तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेल्या कच्च्या रस्त्यावर वाहतुकीचा ताण प्रचंड वाढला आहे. त्यामुळे गर्दी आणि कोंडी अधिक तीव्र होत आहे.

रॉंग साईडने जाणाऱ्या वाहनांमुळे अजिंठा चौफुलीवर सतत ट्राफिक जामची स्थिती निर्माण होत असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. हा प्रश्न केवळ अयोध्या नगर परिसरापुरता मर्यादित नसून सर्व जळगावकरांच्या दैनंदिन प्रवासाशी निगडित आहे. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने जागे होऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने