जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जिल्ह्यातील मोठ्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात आधीच माध्यमिक वेतन पथकाचे अधीक्षक राजमोहन शर्मा यांना निलंबित करण्यात आले असून दोन संस्था चालकांसह जिल्हा परिषदेतल्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल आहे. त्यानंतर या प्रकरणात आता नाशिक विभागाचे निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना अटक करण्यात आली आहे.
अमळनेर तालुक्यातील मनोज पाटील, दत्तात्रय पाटील, तसेच जिल्हा परिषद कर्मचारी अविनाश पाटील आणि निलेश निंबा पाटील या चौघांविरोधात आधीच गुन्हा नोंदवला होता. राज्याच्या शालार्थ प्रणालीमध्ये डिसेंबर २०२३ ते मार्च २०२५ दरम्यान मुख्याध्यापकांसोबत संगनमत करून विद्यार्थ्यांचे बनावट आयडी तयार केल्याचा गंभीर आरोप आहे. या माध्यमातून शासनाचे तब्बल १० कोटी रुपयांचे अनुदान हडपल्याचेही समोर आले आहे.
प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविल्यानंतर चौकशीला वेग आला. विविध शिक्षण संस्थांची पडताळणी करताना निवृत्त उपसंचालक नितीन उपासनी यांचे नाव पुढे आले. चौकशीदरम्यान सहकार्य न केल्यामुळे पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी केली जाणार आहे.
नितीन उपासनी हे पूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तसेच एसएससी बोर्डाचे सचिव राहिले असल्याने त्यांची अटक शिक्षण क्षेत्रात खळबळजनक ठरली आहे.
दरम्यान, या घोटाळ्यात आधीच उदय पंचभाई, राजमोहन शर्मा, किरण पाटील, शरद शिंदे आणि पुरावे फेरफारप्रकरणी अशोक गिरी यांच्यावर नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत. १६ ते २२ नोव्हेंबरदरम्यान चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या चौकशीतून उपासनी यांचा सहभाग उघडकीस आल्यानंतर या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढली आहे.
टिप्पणी पोस्ट करा