जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील सुरू असलेल्या पडताळणी प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक ५ मधील बोगस व दुबार मतदारांच्या तक्रारींच्या अनुषंगाने मनपा कर्मचाऱ्यांनी केलेली पडताळणी (पंचनामा) ही पूर्णपणे बोगस असल्याचा आरोप अॅड. पियुष पाटील यांनी केला आहे. यावर तातडीने कारवाई करून नव्याने पंचनामे करण्याची मागणी त्यांनी मनपा आयुक्तांकडे नोंदवली आहे.
गुरुवारी अॅड. पाटील यांनी अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांची भेट घेऊन संबंधित प्रकरणांबाबत काही महत्त्वाचे पुरावेही सादर केले. या पुराव्यांमधून प्रभाग ५ मधील अनेक मतदारांच्या नावांची पडताळणी करताना मनपा कर्मचाऱ्यांनी अचूक माहिती नोंदवली नसल्याचे दिसून येत असल्याचा दावा त्यांनी केला.
या गंभीर आरोपांवर प्रतिक्रिया देताना अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर म्हणाल्या, “तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित ठिकाणी दुसरे कर्मचारी पाठवून नव्याने पडताळणी केली जाईल. पारदर्शकता राखण्यासाठी पडताळणी दरम्यान शेजारच्या लोकांच्या सह्या घेण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. कुठेही चुकीचे काम होऊ नये याची सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे.”
मतदार याद्यांमध्ये गोंधळ, बोगस नावे व दुबार नोंदीसंबंधी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असताना आता या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. मनपा प्रशासनाने नव्याने पडताळणी करण्यासंदर्भात तयारी दर्शविल्यामुळे प्रभाग ५ मधील मतदार यादीतील अचूकता कितपत सुधारते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा