जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलाचा दुसरा हप्ता जमा करून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या कंत्राटी गृहनिर्माण अभियंता गणेश संभाजी पाटील (वय ३१) तसेच त्याचा पंटर सागर शांताराम कोळी (वय ३०, रा. निंभोरा, ता. धरणगाव) यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी दुपारी करण्यात आली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारदारास सन २०२४-२५ या ब्लॉकमध्ये पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. पहिला हप्ता म्हणून १५ हजार रुपये ३ फेब्रुवारी रोजी त्यांच्या खात्यात जमा झाल्याने त्यांनी घराचे बांधकाम सुरु केले होते. मात्र दुसरा हप्ता न मिळाल्याने त्यांनी पंचायत समिती, धरणगाव येथे चौकशी केली. त्यावेळी अभियंता गणेश पाटील यांनी निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले. परंतु गावातील काही व्यक्तींमार्फत तक्रारदारास माहिती मिळाली की त्यांचा दुसरा हप्ता प्रत्यक्षात जमा झालेला आहे.
त्यानंतर तक्रारदाराने ८ जुलै रोजी पुन्हा पंचायत समितीत जाऊन पाटील यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी दुसरा हप्ता जमा करून देण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने १४ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. या वेळी अभियंता गणेश पाटील यांनी त्यांचा खासगी पंटर सागर कोळी यांच्या मार्फत लाचेची रक्कम स्वीकारण्यास मौखिक संमती दिली होती. कोळीनेही रक्कम स्वीकारण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने दोघांवरही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा