जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांची धुळे येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी धुळे येथील महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वप्नील सांगळे यांची पदोन्नतीवर जळगाव जिल्हा शल्य चिकित्सकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. किरण पाटील हे यापूर्वी जळगावच्या सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत होते. सन २०२० मध्ये कोरोना काळात भुसावळ येथील ८२ वर्षीय महिलेच्या मृत्यूनंतर त्यांचे निलंबन झाले होते. त्यानंतर काही महिन्यांनी त्यांची धरणगाव येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढे सात महिन्यांनंतर राज्य शासनाने त्यांना जळगाव जिल्हा शल्य चिकित्सकपदी पदोन्नती दिली होती.
दि. २१ जानेवारी २०२१ पासून डॉ. किरण पाटील हे जवळपास पाच वर्षे जळगाव जिल्हा शल्य चिकित्सक या पदावर कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात आरोग्यसेवेत अनेक महत्त्वपूर्ण व सकारात्मक बदल घडून आले. मोहाडी येथील स्त्री रुग्णालयाची सुरुवात त्यांच्या काळात झाली. तसेच नवजात शिशु अतिदक्षता विभागात (NICU) आवश्यक त्या सुविधा वाढवून आमूलाग्र सुधारणा करण्यात आल्या. जिल्ह्यातील आरोग्य संस्थांसाठी मनुष्यबळ भरतीसंदर्भात शासनाकडून मंजुरी मिळवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
दरम्यान, नवनियुक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे यांनी धुळे येथे कार्यरत असताना आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबवले. अनेक शासन निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करत त्यांनी प्रशासकीय व वैद्यकीय पातळीवर ठसा उमटवला आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ जळगाव जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला निश्चितच होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा