PCCF (वन्यजीव) यांचा आदेश धुडकावला; संगनमताने चौकशी दाबण्याचा संशय
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I पाटणादेवी–गौताळा अभयारण्यात झालेल्या चंदन तोड प्रकरणात महाराष्ट्र राज्य वनखात्यातील अत्यंत गंभीर व धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्यातील वन्यजीव विभागाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी दिलेल्या लेखी आदेशालाच मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), छत्रपती संभाजीनगर यांनी “हे माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाही” असे म्हणत उघडपणे नाकारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
PCCF (वन्यजीव) यांनी या प्रकरणात विभागीय वन अधिकारी (DFO) व सहाय्यक वनसंरक्षक (ACF) यांनी सादर केलेला चौकशी अहवाल चुकीचा व दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते. तसेच या प्रकरणाची पुढील सखोल चौकशी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांच्याकडे सोपवण्याचे आदेश दिले होते. मात्र, आदेश देऊन जवळजवळ एक महिना उलटूनही कोणतीही चौकशी सुरू न झाल्याने वनखात्याच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या चंदन तोड प्रकरणात १८० हून अधिक छायाचित्रात्मक पुरावे उपलब्ध असूनही चौकशी टाळली जात असल्याने, संपूर्ण प्रकरण दाबण्यासाठी अधिकारी पातळीवर संगनमत सुरू असल्याचा ठोस संशय व्यक्त केला जात आहे. सर्वोच्च अधिकाऱ्यांच्या लेखी आदेशालाच केराची टोपली दाखवली जात असेल, तर शासनाची प्रशासकीय शिस्त आणि नियंत्रण व्यवस्था धोक्यात येत असल्याचे चित्र स्पष्ट होते.
या पार्श्वभूमीवर संबंधित मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), DFO व ACF यांच्याविरुद्ध तातडीने शिस्तभंग कारवाई करून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी थेट मंत्रालय स्तरावर किंवा मुख्य सतर्कता अधिकारी (CVO) यांच्या माध्यमातून करण्यात यावी, अशी जोरदार मागणी विविध स्तरांतून करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा