१४ व्या महा रक्तदान शिबिरात १७१ रक्तदात्यांचा विक्रम; वाहन चालकांची क्रिकेट स्पर्धा उत्साहात
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I सेंट टेरेसा हायर सेकंडरी स्कूल, जळगाव तर्फे समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा कायम ठेवत रविवार दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी सलग चौदाव्या वर्षी महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. याचबरोबर शाळेतील विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन चालक व मालकांसाठी पहिल्यांदाच विशेष क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून सामाजिक बांधिलकीसोबत क्रीडाभावनेचा सुंदर संगम साधण्यात आला.
या महा रक्तदान शिबिरात आजपर्यंतचा सर्वाधिक असा १७१ रक्तदात्यांचा विक्रमी सहभाग नोंदवण्यात आला. शाळेचे पालक, शिक्षक, नागरिकांसह विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ऑटो चालक बंधूंनीही मोठ्या उत्साहात रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला. विशेष म्हणजे या शिबिराप्रसंगी शिक्षक-पालक संघाचे अध्यक्ष श्री. साहेबराव पडलवार, श्री. हर्षल पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर ज्युलेट यांनी स्वतः रक्तदान करून उपस्थितांचे मन जिंकले.
रक्तदान शिबिरावेळी शाळेच्या मुख्य व्यवस्थापिका सिस्टर सेलिन, उपमुख्याध्यापिका सिस्टर डेला, रेडक्रॉस सोसायटीच्या चेअरमन श्रीमती मंगलाताई ठोंबरे तसेच डॉ. प्रसन्न कुमार रेडासानी उपस्थित होते. शिबिराच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल डॉ. रेडासानी यांनी शाळेचे विशेष कौतुक करत, अशा उपक्रमातून इतर शैक्षणिक संस्थांनाही प्रेरणा मिळेल, असे मत व्यक्त केले. दरवर्षी रेडक्रॉस सोसायटीकडून मिळणाऱ्या मोलाच्या सहकार्याबद्दल शाळेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान, महा रक्तदान शिबिराच्या १४व्या वर्धापन दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन चालक व मालकांसाठी आयोजित क्रिकेट स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी झाले होते. चुरशीच्या लढतीनंतर छत्रपती शिवाजी महाराज संघाने अंतिम सामना जिंकत सर्व खेळाडू बाद करून विजेतेपद पटकावले.
छत्रपती शिवाजी महाराज संघात चंद्रशेखर भालेराव (कर्णधार), गणेश शिंदे, अनिल चौधरी, मनोज सोनवणे, सुनील वाणी, मिलिंद अहिरे व नारायण गायकवाड यांचा समावेश होता. द्वितीय क्रमांक सेंट टेरेसा संघाने पटकावला असून या संघात डायजो देवीस (कर्णधार), बोबन देव्हिसिया, विशाल मोरे, विजय उमाळे, हेमंत पाटील, अरविंद पाटील व दीपेश हरणे होते. तर तृतीय क्रमांक शहीद भगतसिंग संघाने मिळवला. या संघात राहुल चौधरी (कर्णधार), राहुल हटकर, दिलीप हटकर, प्रसाद गवळी, अर्जुन हटकर, प्रकाश पाटील व रवी काटे यांचा समावेश होता.
या क्रिकेट स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी जळगाव शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे श्री. तुषार जावळे, श्री. अमोल घुगे, अॅड. मधुरा गाडे, शिक्षक-पालक संघाचे अध्यक्ष श्री. हर्षल पाटील, श्री. साहेबराव पडलवार, माजी सचिव श्री. राजू गवारे, योगेश ट्रॅव्हल्सचे संचालक श्री. राहुल अमृतकर, जिल्हा वीर सावरकर रिक्षा युनियनचे अध्यक्ष श्री. दिलीप सपकाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शाळेच्या मुख्य व्यवस्थापिका मदर सिस्टर सेलिन, मुख्याध्यापिका सिस्टर ज्युलेट, उपमुख्याध्यापिका सिस्टर डेला, फादर जीरीन, क्रीडा शिक्षक शैलेश जाधव, जितेंद्र शिंदे, नरेंद्र भोई यांनीही उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवला. पंच म्हणून अर्पित मंत्री, भूमेश बऱ्हाटे, हर्षल राजवानी, शुभम राणे व विराज मंधवानी यांनी काम पाहिले. तसेच डीजे संचालक तुषार वाणी व विकी वाणी यांनी संगीताच्या माध्यमातून स्पर्धेला रंगत आणली.
समाजसेवा, क्रीडा, एकोप्याची भावना आणि सामाजिक जबाबदारी यांचा आदर्श घालून देणारे हे दोन्ही उपक्रम सेंट टेरेसा हायर सेकंडरी स्कूलच्या सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरले.
टिप्पणी पोस्ट करा