जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील मेहरुण परिसरातील आदित्य चौकात दि. ७ रोजी रात्री मद्यधुंद अवस्थेत एका २८ वर्षीय महिलेनं भर रस्त्यात आरडाओरड करून गोंधळ घातल्याची घटना घडली. नशेच्या अवस्थेत असलेल्या या महिलेने चौकातून जाणाऱ्या वाहनांना अडवून त्यांच्याशी गैरवर्तन केले तसेच काही दुचाकींची तोडफोडही केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रामेश्वर कॉलनी येथील रहिवासी असलेली ही महिला रात्री मद्यपान करून आदित्य चौकात आली. तेथे ती रस्त्याच्या मध्यभागी उभी राहून नागरिकांना अडवत आरडाओरड, शिवीगाळ आणि गैरवर्तन करू लागली. नशेचा कहर इतका की ती वारंवार तोल जाऊन खाली पडत होती.
स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर एमआयडीसी पोलिस पथक तेथे दाखल झाले. त्यावेळी महिलेची नशा इतकी प्रचंड होती की तिला उभे राहणेही कठीण झाले होते. पोलिस व नागरिकांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र ती ऐकण्याच्या स्थितीत नव्हती.
पोलिसांनी तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी केली असता, तिने मद्यपान केल्याचे अहवालात स्पष्ट झाले. याप्रकरणी पोकॉ रवींद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलिस नाईक पंकज पाटील करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा