Top News

गुन्हा नोंदवू नये म्हणून २० हजारांच्या लाचेची मागणी; निंभोरा येथील पोलिस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

 
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I रावेर पोलिस गुन्हा नोंदवून तक्रार चौकशी थांबवण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी निंभोरा पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत पोलिस हवालदार सुरेश पवार यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. तक्रारदारांनी ७ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.

सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार हे शेतकऱ्यांकडून १ लाख २७ हजार रुपयांचा केळी माल घेऊन दिल्लीतील व्यापाऱ्यांना विक्री करणारे होते. मात्र त्याबदल्यात शेतकऱ्यांना पैसे न दिल्याने संबंधितांनी तक्रारदाराविरोधात लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीची चौकशी निंभोरा पोलिस स्टेशनकडे सोपवण्यात आली होती.

चौकशीदरम्यान हवालदार सुरेश पवार यांनी तक्रारदाराचे प्रकरण गुन्ह्यात रूपांतरित होऊ नये यासाठी ‘मदत’ करण्याचे आश्वासन दिले. देयक रकमेच्या १० टक्के ‘सेटिंग’ म्हणून पवार यांनी सुरुवातीला लाचेची मागणी केली. तक्रारदारांनी ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ७ ऑक्टोबर रोजी कळवल्यानंतर पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यात पवार यांनी निंभोरा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांच्यासाठी २० हजार रुपये देण्याची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.

त्या आधारे हवालदार सुरेश पवार यांच्या विरोधात लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली, तर पथकाचे नेतृत्व पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी केले. सापळा पथकात स.फौज. दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ किशोर महाजन, मपोहेकॉ संगीता पवार, पोकॉ राकेश दुसाने, पोकों अमोल सुर्यवंशी, पोकों भूषण पाटील (सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव) यांचा समावेश होता. पुढील तपास उपअधीक्षक योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने