Top News

जळगाव महापालिकेत भाजपला धक्का : प्रभाग १३ मधून जितेंद्र मराठेंना डावलल्याने तीव्र नाराजी, अपक्ष लढण्याचा निर्णय

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर करताच पक्षांतर्गत असंतोष उफाळून आला असून, अनेक ठिकाणी नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. त्यातच प्रभाग क्रमांक १३ मधील भाजपचे विद्यमान नगरसेवक व गेल्या पाच वर्षांत उल्लेखनीय कामगिरी करणारे जितेंद्र मराठे यांना उमेदवारी नाकारल्याने कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

विशेष म्हणजे, प्रभाग १३ मध्ये गेल्या पंचवार्षिक काळात भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले होते. या प्रभागात महाबळ ते रायसोनी नगर, आदर्श नगर, नेहरू नगर या भागांचा समावेश असून, या परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली होती. या यशामध्ये जितेंद्र मराठे यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.

महायुतीतील जागावाटपामुळे गोंधळ
महायुतीत भाजपला ४७, शिवसेनेला २३ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ५ जागा देण्यात आल्या आहेत. याच जागावाटपाच्या सूत्रानुसार प्रभाग १३ (ड) ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला देण्यात आली. त्यानंतर माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे द्वितीय पुत्र प्रफुल्ल देवकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

ही घोषणा होताच प्रभागात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. ‘काम करणाऱ्या उमेदवाराला डावलून नव्या आणि निष्क्रिय उमेदवाराला संधी का?’ असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेषतः गेल्या पाच वर्षांत रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, नागरी सुविधा आणि मूलभूत प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या जितेंद्र मराठेंना बाजूला केल्याने नाराजीचा उद्रेक झाला आहे.

“कामगिरी असूनही तिकीट कापले” – कार्यकर्त्यांचा आरोप
जितेंद्र मराठे यांनी मागील कार्यकाळात प्रभागातील विकासकामांसाठी महापालिकेत सातत्याने पाठपुरावा केला. नागरिकांच्या तक्रारी तात्काळ सोडविणे, निधी आणणे, रस्ते व इतर सुविधा उभारणे यामध्ये त्यांची कामगिरी ठळक राहिली आहे. त्यामुळे यंदाही त्यांचे तिकीट निश्चित मानले जात होते.

मात्र सोमवारी रात्री अचानक राजकीय घडामोडी घडल्या आणि त्यातच मराठेंना वगळण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला. “काम करणाऱ्याला बाजूला करून केवळ राजकीय समीकरणांवर उमेदवारी दिली गेली,” असा आरोप समर्थकांकडून होत आहे.

लोकाग्रहामुळे अपक्ष लढणार
या सर्व पार्श्वभूमीवर जितेंद्र मराठे यांनी नागरिकांच्या आग्रहास्तव अपक्ष उमेदवारी लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. प्रभागातील नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थकांकडून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर दबाव होता. “जनतेचा विश्वास आणि प्रेम पाहता मी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

प्रभाग १३ मध्ये रंगणार तिरंगी लढत?
मराठेंच्या अपक्ष उमेदवारीमुळे प्रभाग १३ मध्ये निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका बाजूला महायुतीचा उमेदवार, दुसरीकडे भाजपचे माजी नगरसेवक अपक्ष आणि तिसरीकडे इतर राजकीय पर्याय अशी तिरंगी लढत होण्याचे संकेत आहेत.

या घडामोडीमुळे भाजपच्या स्थानिक नेतृत्वासमोर आव्हान उभे राहिले असून, ही नाराजी इतर प्रभागांवरही परिणाम करणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने