जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
जळगाव महानगरपालिका निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून प्रभाग क्रमांक 13 मधून ग. स. सोसायटीचे माजी अध्यक्ष श्री. मगन व्यंकट पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
शहराच्या सामाजिक व सहकार क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत असलेले मगन पाटील हे सर्वसामान्य नागरिकांमध्ये लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. ग. स. सोसायटीचे अध्यक्ष असताना त्यांनी पारदर्शक कारभार, सभासदहिताचे निर्णय आणि विकासाभिमुख कामकाज करून विश्वास संपादन केला आहे. त्याच अनुभवाच्या बळावर त्यांनी आता थेट महापालिकेच्या निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत शक्तीप्रदर्शन केले. परिसरात जल्लोषाचे वातावरण होते. यावेळी बोलताना मगन पाटील म्हणाले की, “प्रभागातील नागरी सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि युवकांसाठी विकासकामे हेच माझे प्रमुख प्राधान्य असेल. नागरिकांचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे.”
प्रभाग क्रमांक 13 हा शहरातील महत्त्वाचा प्रभाग मानला जातो. येथील मतदारसंख्या मोठी असून विविध समाजघटकांचा समावेश आहे. त्यामुळे या प्रभागातील लढत चुरशीची होणार हे निश्चित आहे. पाटील यांच्या उमेदवारीमुळे इतर इच्छुक उमेदवारांचीही धावपळ वाढली असून राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महानगरपालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, मगन व्यंकट पाटील यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 13 मधील निवडणूक अधिक रंगतदार होणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा