Top News

जळगावात खळबळ, चक्क एका इच्छुक उमेदवाराने राष्ट्रवादी अजित पवार गटाला बसविला धक्का

 

उमेदवारी जाहीर न करताच अर्ज दाखल, नेत्यांच्या घरात तिकिटे; कार्यकर्त्यांत तीव्र असंतोष, महानगर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा 

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव महानगरपालिकेची निवडणूक आता अत्यंत रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपली असली तरी भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी (अजित पवार गट) या महायुतीची अधिकृत उमेदवार यादी अद्याप जाहीर झालेली नाही. बंडखोरी उसळू नये म्हणून नेत्यांनी थेट ‘एबी फॉर्म’ जोडून उमेदवारी अर्ज भरून घेतले असून कोणत्याही पक्षाने अधिकृत यादी जाहीर करण्याची हिंमत दाखवलेली नाही.

दिवसभर महायुतीच्या गोटात प्रचंड नाट्यमय घडामोडी घडल्या. जागावाटपावरून निर्माण झालेल्या असंतोषाचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला बसला असून, महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. आपलेच तिकीट कापले गेल्याची कुणकुण लागताच त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या घटनेमुळे महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत.

दरम्यान, भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील अनेक बड्या नेत्यांनी आपल्या कुटुंबीयांना तिकिटे दिल्याने पक्षांतर्गत असंतोषाचा उद्रेक झाला आहे. शेवटच्या दिवशी शेकडो इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करत नाराजी उघडपणे व्यक्त केली. भाजपने यावेळी अनेक जुने, निष्ठावंत नेते डावलून नवख्या चेहऱ्यांना संधी दिल्याचा आरोप होत आहे. मात्र, या नवख्या उमेदवारांमध्येही बहुतांश जण हे पदाधिकाऱ्यांचे निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे.

स्थायी समितीचे माजी सभापती जितेंद्र मराठे यांची उमेदवारी कापण्यात आल्याने संघ परिवारात तीव्र नाराजी पसरली आहे. राष्ट्रवादीला जागा सोडण्यासाठी मराठेंचा बळी देण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. त्यामुळे भाजपच्या पारंपरिक मतदारांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे.

भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्या घरात तब्बल तीन तिकिटे दिल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. यामध्ये शालक विरेन खडके, मुलगा विशाल भोळे व पत्नी सीमा भोळे यांचा समावेश आहे. याशिवाय पहूर येथील रहिवासी व अलीकडेच जळगावात वास्तव्यास आलेले अरविंद देशमुख यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याने तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.

शिवसेना शिंदे गटातही नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. महानगरप्रमुख संतोष पाटील यांची उमेदवारी कापण्यात आल्याने वातावरण चांगलेच तापले. त्यांनी सोमवारी आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला होता. तरीही त्यांना उमेदवारी न मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे.

एकूणच जळगाव महापालिका निवडणूक ही आता केवळ राजकीय लढत न राहता घराघरांत उमेदवारी, पक्षांतर्गत नाराजी आणि संभाव्य बंडखोरी यांचे केंद्रबिंदू बनली आहे. माघारीच्या अंतिम टप्प्यात कोणते धक्कादायक निर्णय घेतले जातात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने