जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून प्रभाग क्रमांक १३ मधून उमेदवारी जाहीर झालेल्या वैशाली अमित पाटील या आज दुपारी समर्थकांसह मोठ्या शक्तीप्रदर्शनात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
वैशाली पाटील या भाजपचे निवडणूक प्रभारी तथा चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांचे निकटवर्तीय असलेले अमित पाटील यांच्या पत्नी असून, त्यांना सर्वसाधारण महिला प्रवर्गातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक १३ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे.
यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजपकडून अनुभवी नगरसेवकांसह काही नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात येत असून, त्यामध्ये काही धक्कादायक नावांचाही समावेश आहे. त्याच पार्श्वभूमीवर वैशाली पाटील यांची उमेदवारी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, आज दुपारी १ वाजता भाजप कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून, यामध्ये महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला तसेच उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली जाणार आहे. कोणत्या प्रभागातून कोणाला संधी मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा