Top News

भाजपमध्ये उमेदवारीवर मोठी कात्री! 22 दिग्गजांचा पत्ता कट; जळगावात गटबाजी उघड

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात मोठी खळबळ उडाली असून, इच्छुक उमेदवारांपैकी तब्बल २२ दिग्गजांना उमेदवारी नाकारली जाणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या यादीत पक्षाशी दीर्घकाळ निष्ठा ठेवलेल्या १२ कार्यकर्त्यांचा समावेश असल्याने भाजपमधील अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर आले आहे.

महापौरपदावर नियंत्रण राहावे, यासाठीच जळगाव शहरातील काही मातब्बर लोकप्रतिनिधींना बहुमत मिळू नये, याची काळजीपूर्वक आखणी करण्यात येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोणत्या गटाला किती उमेदवारी मिळते, यावरच संपूर्ण राजकीय गणित अवलंबून असल्याचे दिसून येत आहे.

प्रभागनिहाय पाहता, प्रभाग क्रमांक १ मध्ये दोघांना डच्चू देण्यात येणार असून नितीन भाऊंचे तीन उमेदवार मैदानात उतरतील. प्रभाग क्रमांक २ मध्ये एका उमेदवाराची उमेदवारी कट होणार आहे. प्रभाग क्रमांक ३ मध्ये मात्र नितीन भाऊंचाच वरचष्मा राहणार असल्याचे संकेत आहेत.

प्रभाग क्रमांक ४ मध्ये सोनवणे यांच्याव्यतिरिक्त इतर तिघांना फटका बसणार आहे. प्रभाग क्रमांक ५ मध्ये भाजपकडून बाहेरच्या नवख्या उमेदवाराला संधी देण्याचा निर्णय जवळपास निश्चित मानला जात आहे. प्रभाग क्रमांक ६ मध्येही सोनवणे यांना उमेदवारी गमवावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.

प्रभाग क्रमांक ७ मध्ये पाटील यांना फटका बसणार असून, येथे एका पोलिस अधिकाऱ्याची एन्ट्री तसेच राष्ट्रवादीकडील एका उमेदवाराला संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक ८ मध्ये भोईटेंसह नवख्या उमेदवाराला संधी दिली जाणार आहे.

प्रभाग क्रमांक ९ मध्ये भाजपच्या एका दिग्गज नेत्याची उमेदवारी कट होणार आहे. प्रभाग क्रमांक १० मध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याचे संकेत आहेत. प्रभाग क्रमांक ११ मध्ये पूर्णपणे नवीन उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे.

प्रभाग क्रमांक १२ मध्ये केवळ एका उमेदवारात बदल करण्यात येणार असून, प्रभाग क्रमांक १३ मधील उमेदवाराला मोठा धक्का बसणार आहे. प्रभाग क्रमांक १४ मध्येही नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. प्रभाग क्रमांक १५ मध्ये देशमुख आणि बालाजी यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. प्रभाग क्रमांक १६ मध्ये कोल्हे यांच्यासह खडके यांची नावे फायनल असून, प्रभाग क्रमांक १७ मध्ये काही किरकोळ बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकूणच भाजपमध्ये उमेदवारीवरून मोठी उलथापालथ होत असून, गटबाजी, समीकरणे आणि महापौरपदाच्या राजकारणामुळे अनेक अनुभवी नेते बाजूला फेकले जात असल्याचे चित्र आहे. अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर पक्षातील नाराजी उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

👉 जळगाव महापालिका निवडणुकीतील ही अंतर्गत लढाई भाजपसाठी कितपत फायदेशीर ठरणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने