जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I मेहरूण स्मशानभूमीत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेकडे वारंवार पाठपुरावा करूनही तब्बल २०० दिवस कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर संतप्त नागरिकांना ९ डिसेंबर रोजी स्मशानभूमीत सरणावर बसून आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागला.
आंदोलनाची माहिती मिळताच आमदार सुरेश भोळे यांनी तत्काळ लक्ष घालून आंदोलकांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. नागरिकांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे त्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या
स्मशानभूमीत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. मनपा प्रशासनाकडे वारंवार निवेदन दिल्यानंतरही समस्या कायम असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. इलेक्ट्रिक शवदाहिनीची उभारणी, सभामंडपाचे बांधकाम यांसह इतर सुविधा उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली.
२०० दिवसांची प्रतीक्षा आणि अखेर आंदोलन
यापूर्वी मनपाने काही कामे सुरू करणार असल्याचे सांगत नागरिकांना आंदोलन न करण्याचे आवाहन केले होते. नागरिकांनी त्यास सहकार्यही केले. मात्र, त्यानंतर २०० दिवस उलटूनही प्रत्यक्ष कामांना सुरुवात न झाल्याने नागरिकांचा संताप वाढला. परिणामी गणेश पाटील आणि संदीप मांडोळे यांनी सरणावर बसून आंदोलनास सुरुवात केली.
या आंदोलनात संजय जगताप, अरुण मालपाणी, डी. आर. पाटील, संजय सपकाळे, अतुल महाजन, हर्षल वाणी, महेश माळी, विशाल गुजर, भूषण सोनवणे, गणेश सोनवणे, नीलेश घुगे पाटील यांच्यासह परिसरातील अनेक महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
टिप्पणी पोस्ट करा