जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I अक्सानगर परिसरातील संतोषी माता मंदिर रस्त्यावर शुक्रवारी (५ डिसेंबर) सकाळी सुमारे १०.३० वाजता घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसर हदरला. विजेचा जबर धक्का बसून वडील आणि मुलीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण भागात शोककळा पसरली.
मृत झालेल्या मौलाना साबीर खान यांचे कुटुंब केवळ २० दिवसांपूर्वी जुने भाड्याचे घर सोडून अक्सानगरातील शेख मुबीन यांच्या घरात राहायला आले होते. नव्या घरात स्थिरस्थावर होण्याआधीच नियतीने त्यांच्या कुटुंबावर घाला घातला.
साबीर खान हे अक्सानगरातीलच एका दुसऱ्या भागात राहत होते. सकाळची दिनचर्या आटोपून ते घरात बसले असताना ही दुर्घटना घडली. एकााच घरातील दोन सदस्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.
घटनेच्या वेळी आई व मुलगा घरातच
दुर्घटनेच्या वेळी साबीर खान यांची पत्नी सबीना बी. साबीर खान आणि त्यांचा सहा वर्षांचा मुलगा अली हे घरातच उपस्थित होते. शेजाऱ्यांनी सुज्ञपणे त्यांना बाहेर न येण्याचा सल्ला दिल्याने ते दोघेही सुरक्षित राहिले. जखमी फातिमावर उपचार सुरू आहेत.
महावितरणवर निष्काळजीपणाचा आरोप
मयतांचे नातेवाईक व स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना घडल्यानंतरही काही काळ या परिसरातील वीजपुरवठा बंद करण्यात आला नव्हता, यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त केला. परिसरातील धोकादायक विद्युत तारा हटवण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून करण्यात येत होती.
सामाजिक कार्यकर्ते रयान जहागिरदार यांनी सांगितले की, साबीर खान यांनी स्वतःही महावितरणकडे ही तार काढण्याची मागणी केली होती; मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. या निष्काळजीपणामुळेच हा दुर्दैवी प्रकार घडल्याचा त्यांचा आरोप आहे. काही वर्षांपूर्वीही याच भागात रिक्षावर विद्युत तार कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची आठवण त्यांनी करून दिली.
घटनेनंतर संतप्त नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयात धाव घेत मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली.
टिप्पणी पोस्ट करा