जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरात गेल्या काही महिन्यांपासून विविध भागात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. परंतु या बांधकामातून निर्माण होणारे वेस्ट मटेरियल — खडी, वाळू, सिमेंट, लोखंडी साहित्य तसेच लाकडी पाट्या — थेट रस्त्यावर टाकल्याने वाहतुकीसमोरील अडथळे वाढले असून नागरिकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे.
रस्त्यावर पडलेल्या या साहित्यामुळे केवळ वाहतूक कोंडीच होत नाही, तर बारीक वाळू आणि खडीमुळे दुचाकी घसरून अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद असल्याने रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिकच भयंकर होते.
डॉ. विद्या गायकवाड यांच्या आदेशानंतर सुधारणा, पण आता पुन्हा जैसे थे
तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी रस्त्यांवर विनापरवानगी बांधकाम साहित्य टाकणारे तसेच अवैध जाहिरात फलक लावणाऱ्यांवर दोन ते पाच दंडात्मक कारवाया दररोज करण्याचे कठोर आदेश दिले होते.
या आदेशामुळे शहरात काही काळ धास्तीचे वातावरण होते आणि रस्त्यांवरील साहित्य हटवण्यात आले होते. मात्र, त्यांच्या बदलीनंतर या आदेशांची अंमलबजावणी पूर्णपणे थंडावली असून शहरात पुन्हा जुन्याच समस्यांचा सामना करावा लागत आहे.
मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष
नागरिकांच्या मते, महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते आणि व्यापारी भागात खडी, वाळू व इतर बांधकाम साहित्याचे ढिगारे उभे राहिले आहेत. आयुक्तांनी तातडीने लक्ष देऊन जुन्या आदेशांची अंमलबजावणी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी जळगावकरांकडून होत आहे.
निवडणुकीमुळे यंत्रणा व्यस्त – तरीही कारवाई होणार
महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे म्हणाले, “सध्या निवडणुकीचे काम सुरू असून मनपा यंत्रणा व्यस्त आहे. तरीदेखील रस्त्यावर वेस्ट मटेरियल टाकून रहदारीत अडथळा निर्माण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. शहर अभियंत्यांना स्पष्ट सूचना देण्यात येतील.”
धोक्याचे वाढते चित्र
१. मोहाडी रस्ता : धोकादायक वळणावर वाळूच वाळू
डी-मार्टकडून मोहाडी दिशेकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहन दुरुस्तीशी संबंधित एका व्यावसायिकाने वाळू थेट रस्त्यावर टाकून ठेवली आहे. या भागात दुचाकी घसरण्याचा धोका अत्यंत जास्त असल्याचे दिसून आले.
२. मेहरूण तलाव परिसर : खडी, सिमेंट, फर्निचर वेस्टने रस्ते अडले
या परिसरात अनेक ठिकाणी बांधकाम साहित्याचे ढिगारे तसेच फर्निचरचे वेस्ट रस्त्यावर पसरलेले दिसले. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना मोठा अडथळा येत असून वाहतूक कोंडी नियमितपणे होत आहे.
३. रिंगरोड : अतिक्रमण + बांधकाम साहित्य = जीवघेणा प्रवास
तिसऱ्या रिंगरोडवर सुरू असलेल्या इमारतींच्या बांधकामांजवळ खडी व वाळूचे प्रचंड ढीग रस्त्यालगत आढळले. दुसऱ्या बाजूस लहान व्यावसायिकांच्या टपऱ्यांचे अतिक्रमण असल्याने आधीच अरुंद रस्ता अधिकच धोकादायक बनला आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत धरून जाण्यासारखे झाले आहे.
नागरिकांची मागणी : तातडीची कारवाई हवी
जळगावमधील नागरिकांनी महापालिका प्रशासनाला कडक शब्दांत मागणी केली आहे की— रस्त्यावर पडलेले बांधकाम साहित्य तात्काळ हटवावे, पूर्वीचे दंडात्मक आदेश पुन्हा सक्तीनं अंमलात आणावेत, अतिक्रमण हटवून रस्त्यांची रुंदी कायम ठेवावी,बंद स्ट्रीट लाईट ताबडतोब दुरुस्त कराव्यात.
टिप्पणी पोस्ट करा