बऱ्हाणपूर (म.प्र.) येथील चोरीचा गुन्हा उघड; रिक्षासह दोघांना अटक
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश मिळाले आहे. मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर शहरात रिक्षातून प्रवाशांचे खिसे कापणाऱ्या अट्टल चोरट्यांना LCB पथकाने जेरबंद केले असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे वसीम कय्युम खाटीक (वय ३३, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) आणि तौसीफ सत्तार खान (वय ३६, रा. रामनगर, जळगाव) अशी आहेत.
बऱ्हाणपूर (म.प्र.) येथील कोतवाली पोलीस ठाण्यात गु.नं. २०२/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) (वाहनातील चोरी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. अज्ञात आरोपींनी प्रवाशांना रिक्षात बसवून अत्यंत शिताफीने त्यांचे खिसे कापल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती.
सदर गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच जळगाव येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार वसीम खाटीक आणि तौसीफ खान यांनीच हा गुन्हा केल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली.
त्यांनी तत्काळ पथकाला कारवाईचे आदेश दिले. LCB च्या पथकाने गोपनीयरीत्या सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
यानंतर LCB ने बऱ्हाणपूर कोतवाली पोलीस ठाण्याशी संपर्क साधून दोन्ही आरोपींना आणि गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले.
कौतुकास्पद कारवाई :
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि LCB प्रमुख वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, तसेच अंमलदार अतुल वंजारी, अकरम शेख, विजय पाटील, नितीन बाविस्कर, प्रविण भालेराव, किशोर पाटील, रविंद्र कापडणे, राहुल रगडे, नाना तायडे आणि महेश सोमवंशी यांनी मोलाची भूमिका बजावली.
टिप्पणी पोस्ट करा