Top News

कावडिया यांच्या मृत्यूला तिसरा दिवस उलटूनही कुटुंबीयांचा जबाब घेण्यास पोलिसांची प्रतीक्षा

विधीनंतरच बोलू, अशी भूमिका, मोबाईल ठरू शकतो तपासातील कळीचा धागा, मित्राशी केलेल्या कॉलवरून संशय बळावला

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथील प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजकुमार प्रकाशचंद कावडिया (वय ५७, रा. जामनेर) यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर पोलिस तपासाची दिशा अधिक गंभीर होत आहे. कावडिया यांच्या मृत्यूला तिसरा दिवस उलटल्यानंतरही त्यांच्या मोबाईलबाबत पोलिसांना काही ठोस धागेदोरे मिळाले नाहीत.

उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबीयांचे जबाब घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र कुटुंबीयांनी, “सर्व विधी पार पडल्यानंतरच आम्ही पोलिसांसमोर आपले म्हणणे मांडू,” अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे तपास थोड्या काळासाठी थांबलेला असला तरी, पोलिसांनी सर्व शक्य कोन तपासात ठेवले आहेत. कावडिया यांच्या मृत्यूनंतर जिल्हाभरात सुसाईड नोट व व्हिडिओबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. या नोटमध्ये काही दिग्गज व्यक्ती आणि अधिकाऱ्यांची नावे असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनीही या चर्चेला गांभीर्याने घेतले असून, सुसाईड नोट किंवा संबंधित व्हिडिओ मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली आहे. मात्र अद्याप पोलिसांच्या हाती कोणताही ठोस पुरावा लागलेला नाही.

कावडिया यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या मित्राला फोन केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांनी विष घेण्यापूर्वी यू-ट्यूबवर काही व्हिडिओ पाहिल्याचे डॉक्टरांना सांगितल्याचा उल्लेख नोंदवला गेला आहे. त्यामुळे त्यांच्या मोबाईल फोनमध्ये मृत्यूपूर्व घटनांची महत्त्वपूर्ण माहिती असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिस आता मोबाईलचा शोध घेण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत.

कावडिया यांच्यावर बनावट कागदपत्रे वापरून शैक्षणिक संस्थेच्या इमारतीचे बांधकाम केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. त्यामुळे त्यांच्या मृत्यूमागे या प्रकरणाचा काही संबंध आहे का, याचीही चौकशी केली जात आहे. या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद (AD) करण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर व्हिसेरा नमुना राखून ठेवण्यात आला असून, त्याच्या तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे. याच अहवालातून राजकुमार कावडिया यांच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल. कावडिया यांच्या मृत्यूनंतर अनेक चर्चा जिल्हाभरात रंगू लागल्या आहेत. सुसाईड नोट मिळत नसल्याने आणि कुटुंबीयांनी त्याबाबत अनभिज्ञता दर्शवल्याने, काहींचा “या प्रकरणात कोणाचा तरी हस्तक्षेप होत आहे का?” असा संशय वाढू लागला आहे. सध्या पोलिस तपास विविध दिशांनी सुरू असून, मोबाईल हाती लागल्यानंतर या प्रकरणाचे अनेक गुपिते उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने