पोलिसांची निष्काळजीपणा चव्हाट्यावर! दोन आरोपी ताब्यातून पसार, पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I अमळनेर तालुक्यातील मोटारसायकल चोरी प्रकरणात अटकेत असलेल्या दोन संशयित आरोपींनी पोलीसांना अक्षरशः चकवा देत ताब्यातून पलायन केल्याची धक्कादायक घटना दोंडाईचा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. आज, शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान ही घटना घडली असून या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
२४ मोटारसायकली जप्त; आरोपींना न्यायालयीन कोठडी
अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल मोटारसायकल चोरी प्रकरणात तालुक्यातील सातपिंपरी येथील
1. अंबालाल भूरट्या खरर्डे
2. हिम्मत उर्फ रेहज्या पावरा
या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. चौकशीदरम्यान पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून तब्बल २४ मोटारसायकलींचा मोठा साठा जप्त केला होता. पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
जळगाव कारागृहात जागा नसल्याने नंदुरबारकडे हलवताना घडली घटना
जळगाव कारागृहात जागा उपलब्ध नसल्याने दोन्ही आरोपींना शासकीय वाहनाने नंदुरबार कारागृहाकडे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. अमळनेर पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी आरोपींसह नंदुरबारकडे रवाना झाले होते.
दोंडाईचा पोलीस ठाण्याच्या हद्दीत धावडे गावाजवळील नयन हॉटेलसमोर चहा–पाण्यासाठी वाहन थांबवण्यात आले. याच क्षणाचा फायदा घेत दोन्ही आरोपींनी पोलिसांना चकवा देत तेथून पलायन केले.
नाकाबंदी, शोधमोहीम तीव्र — तरीही आरोपी फरार
घटनेची माहिती मिळताच
– दोंडाईचा पोलीस
– अमळनेर पोलीस
– धुळे व नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेची पथके
त्वरित घटनास्थळी दाखल झाली. संपूर्ण परिसरात नाकाबंदी करून शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र रात्री उशिरापर्यंत आरोपींचा काहीही मागोवा लागलेला नव्हता.
प्रश्नचिन्हाखाली पोलीसांचे शिथिल नियोजन
दुपारच्या गर्दीच्या वेळी आणि दोन्ही आरोपी गंभीर गुन्ह्यातील असल्याचे माहित असतानाही त्यांना खुलेपणाने चहा–पाण्यासाठी उतरवणे, पुरेसे सुरक्षा उपाय न ठेवणे—या सर्व प्रकारांमुळे पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी होणार असून दोषींवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या धक्कादायक पलायन प्रकरणामुळे अमळनेर व धुळे–नंदुरबार परिसरात कायदा-सुव्यवस्थेबाबत चर्चा रंगल्या असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके युद्धपातळीवर कार्यरत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा