पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नलुबाई सोनवणे यांचा शेकडो समर्थकांसह पक्षप्रवेश
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
जळगाव शहरातील मेहरूण परिसराला आपल्या सामाजिक कार्यामुळे विशेष ओळख निर्माण करून देणारे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र व महेंद्र तुळशीदास सोनवणे यांचा परिवार आज शिवसेना शिंदे गटात अधिकृतपणे दाखल झाला आहे. मेहरूणचे प्रथम सरपंच तसेच परिसरात आदराचे स्थान असलेल्या सोनवणे परिवाराकडून झालेला हा प्रवेश शिंदेसेनेच्या शक्तीत मोठी भर व ‘पॉवर बूस्ट’ म्हणून पाहिला जात आहे.
सोनवणे परिवारातील ज्येष्ठ मातोश्री नलुबाई तुळशीदास सोनवणे यांनी आज सकाळी झालेल्या विशेष कार्यक्रमात आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. पक्षप्रवेश कार्यक्रमाला जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. त्यांनी सोनवणे परिवाराचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पक्षाच्या वाढीतील हा महत्वाचा टप्पा असल्याचे सांगितले.
पालकमंत्री पाटील म्हणाले की, “मेहरूणसह संपूर्ण जळगावात शिंदेसेनेला नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. सोनवणे परिवाराच्या विश्वासामुळे पक्ष आणखी मजबूत होणार आहे व स्थानिक विकासाची गती वाढणार आहे.”
नलुबाई सोनवणे यांनी शिंदे गटात प्रवेशानंतर बोलताना सांगितले की, “गुलाबराव पाटील यांच्या कार्यपद्धतीवर व जनसामान्यांसाठी सातत्याने केलेल्या कामांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मेहरूणसह जळगावच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार केला आहे.”
या प्रवेशामुळे मेहरूण भागातील स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. शेकडो समर्थकांच्या गर्जना व उत्साहात झालेला हा पक्षप्रवेश शिंदेसेनेला जळगावात नवी ऊर्जा देणारा ठरला आहे.
टिप्पणी पोस्ट करा