Top News

धक्कादायक I कामाच्या ठिकाणचा छळ व सेवेतून काढून टाकल्याच्या तणावामुळे इसमाची आत्महत्या

पुन्हा महाविद्यालयात येऊ नका’, महाविद्यालयाने दिली होती त्या इसमाला तंबी 

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील देविदास कॉलनी येथील ५२ वर्षीय महेश भास्करराव सावदेकर यांनी कामाच्या ठिकाणी चाललेल्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (१७ नोव्हेंबर) दुपारी घडली. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

महेश सावदेकर हे मू.जे. महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीने कार्यरत होते. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, कायमस्वरूपी नोकरी मिळावी यासाठी त्यांनी जवळपास १५ लाख रुपये दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तरीही, ‘पुन्हा महाविद्यालयात येऊ नका’, असे सांगत त्यांना काही दिवसांपूर्वीच सेवेतून हटवण्यात आले होते. या गोष्टीमुळे ते मानसिकदृष्ट्या अत्यंत तणावाखाली होते.

सोमवारी दुपारी पत्नी यशोधरा सावदेकर कामावर गेल्या होत्या तर मुलगा क्लासला गेला होता. त्या दरम्यान महेश हे घरी एकटे असताना त्यांनी विषारी द्रव प्राशन केले. दुपारी तीनच्या सुमारास शेजाऱ्यांना ते जमिनीवर कोसळलेल्या अवस्थेत दिसले. त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याने त्यांनी तातडीने कुटुंबीयांना कळविले.

कुटुंबीयांनी त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

या घटनेनंतर पत्नी यशोधरा सावदेकर यांनी धक्कादायक आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, महेश सावदेकर यांना कंत्राटी नोकरीच्या नावाखाली वर्षानुवर्षे विविध कामे करून घेतली जात होती. कागदोपत्री जास्त पगार दाखविला जात असला तरी प्रत्यक्षात त्यांना अत्यल्प पैसे मिळत होते. कायमस्वरूपी नोकरीसाठी दिलेले १५ लाख रुपये व मध्यस्थी करणारे दिलीप रामू पाटील यांची भूमिका याबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

दीड महिन्यापूर्वी सेवेतून बाहेर काढल्यानंतर महेश वारंवार महाविद्यालयात गेल्याचे, मात्र तेथे त्यांना दुर्लक्षपूर्ण व उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे यशोधरा यांनी सांगितले. “मी त्यांच्या हातापाया पडलो तरी त्यांनी नोकरी दिली नाही,” असा त्रागा महेश व्यक्त करत असत, असेही त्यांनी नमूद केले. या मानसिक तणावामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा कुटुंबाचा ठाम आरोप आहे.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी सावदेकर कुटुंबीयांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने