Top News

नायरा पेट्रोलपंप दरोडा प्रकरणात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे मोठे यश — १० आरोपी निष्पन्न

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I चाळीसगाव ते कन्नड रोडवरील नायरा पेट्रोलपंपाच्या पाठीमागे फिर्यादी योगेश नेताजी पाटील (रा. पाचोरा, जि. जळगाव) आणि त्यांच्या पत्नी व नातेवाईकांना अडवून त्यांच्यावर काठीने हल्ला करून जबरीने दरोडा टाकणाऱ्या ७ ते ८ अनोळखी इसमांचा छडा लावण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे.

या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी जलद आणि कसून तपास करून एकूण १० आरोपींची ओळख पटवली आहे. फिर्यादी योगेश पाटील हे त्यांच्या चारचाकीने पुण्याकडे जात असताना नायरा पेट्रोलपंपाजवळ रस्त्यावर अवजड वस्तू फेकून त्यांचे वाहन थांबवण्यात आले. याच संधीचा फायदा घेत ७ ते ८ दरोडेखोरांनी फिर्यादी आणि त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना काठीने बेदम मारहाण केली व त्यांच्याकडील सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल फोन आणि रोकड रक्कम असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने लुटून नेला. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३७/२०२५ भा.दं.सं. कलम ३१०(२), ३०९(६), ३२४(४) प्रमाणे दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव परिमंडळ व विजयकुमार ठाकुरवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगाव यांनी घटनास्थळी भेट देत आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली व पोउपनि. सोपान गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने सलग सहा दिवस दिवस-रात्र मेहनत घेऊन चाळीसगाव ते नांदगाव आणि नांदगाव ते छत्रपती संभाजीनगर या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने अभ्यास केला. त्यातून गुन्ह्यात वापरलेला ट्रक क्रमांक MH 12 KP 5925 निष्पन्न झाला. 

या ट्रकच्या मालकासह पोलिसांनी एकूण १० आरोपींची ओळख पटवली असून त्यात अर्जुन बालाजी शिंदे, अशोक हिरामण शिंदे, शंकर शिवाजी पवार, सुनिल हिरामण शिंदे, राहुल अनिल काळे, छगन महादेव काळे, श्विरे अंकुश पवार, राहुल अनिल शिंदे, संजय रामा काळे व रामा सुबराव काळे (ट्रक मालक) सर्व रा. लक्ष्मी पारधी पेठ, तेरखेडा, ता. वाशी, जि. धाराशिव यांचा समावेश आहे. या आरोपींनी धाराशिव जिल्ह्यातील मुरुम पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील अशाच प्रकारचा दरोडा घातल्याची माहिती मिळाली असून धाराशिव पोलिसांनी आरोपी अर्जुन शिंदे आणि अशोक शिंदे यांना मुरुम गुन्ह्यात अटक केली आहे.

 चाळीसगाव ग्रामीण पोलिस हे आरोपींचा प्रोड्यूस वॉरंट घेऊन त्यांना ताब्यात घेणार आहेत, तर उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे. 

या यशस्वी कारवाईसाठी मा. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, मा. श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक व मा. श्री विजयकुमार ठाकुरवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोउपनि. सोपान गोरे, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, सलीम तडवी, भुषण शेलार, महेश पाटील, भुषण पाटील, सागर पाटील, मयुर निकम, सचिन घुगे, सिद्धेश्वर डापकर, रतनहरी गिते, ईश्वर पाटील, प्रदिप सपकाळे, गौरव पाटील, मिलींद जाधव व चापोकॉ बाबासाहेब पाटील यांनी विशेष मेहनत घेतली. या तपासामुळे प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने