Top News

आयटीसी संगीत महोत्सवात रसिक तल्लीन : शास्त्रीय सुरांनी भारला वातावरण


जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आणि आयटीसी संगीत रिसर्च अकादमी, कोलकाता यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय “आयटीसी संगीत महोत्सव” ला शनिवारी सुरुवात झाली. जळगाव येथील भैय्यासाहेब गंधे सभागृहात रंगलेल्या या सुरेल सोहळ्यात पहिल्याच दिवशी रसिक शास्त्रीय सुरांच्या लहरीत तल्लीन झाले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त श्री. दीपक चांदोरकर यांच्या गुरुवंदनेने झाली. दीपप्रज्वलनाचा मान आयटीसी संगीत अकादमीचे गुरु पं. ओंकार दादरकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, कार्यकारी विश्वस्त श्री. चांदोरकर आणि प्रा. शरदचंद्र छापेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी यांनी मान्यवरांचा सत्कार केला, तर प्रास्ताविक दीपक चांदोरकर यांनी सादर केले.

या प्रसंगी पं. ओंकार दादरकर यांनी अकादमीच्या कार्याचा आढावा घेत रसिकांशी संवाद साधला.

🎵 पहिले सत्र : सरोदचे सुरेल रेशीम

पहिल्या सत्रात आयटीसी अकादमीचे युवा कलाकार कौस्तव रॉय यांनी आपल्या सरोद वादनाने सभागृह मंत्रमुग्ध केले. त्यांना भोपाळचे तबलावादक रामेंद्रसिंह सोळंकी यांनी प्रभावी साथ दिली. कौस्तव यांनी राग श्री मध्ये जोड आणि झाला सादर करत रागाची मोहकता खुलवली. त्यानंतर त्यांनी धमार आणि अध्दा तालातील रचना सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली.

🎶 दुसरे सत्र : ओंकार दादरकर यांचे भावसंपन्न गायन

दुसऱ्या सत्रात आयटीसी अकादमीचे गुरु पं. ओंकार दादरकर यांनी आपल्या सुरेल आणि भावपूर्ण गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी विलंबित झुमरा तालात राग मारुबिहाग मधील बडा ख्याल “जागे मेरे भाग” सादर केला, त्यानंतर दृत एकतालातील “पारी मोरी नाव” ही बंदिश गायली.
यानंतर विदुषी गिरीजा देवी यांनी स्वरबद्ध केलेला मिश्र किरवाणी रागातील दादरा “तुम बिन गाईन” सादर करत सभागृहात रसिक भावनेचा आविष्कार घडवला.
याच सत्रात त्यांनी आपल्या आत्या, सुप्रसिद्ध गायिका विदुषी माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या गायकीला अभिवादन केले. “अमृताहुनी गोड नाम तुझे देवा” हे भजन आणि संगीत कान्होपात्रा नाटकातील अजरामर भैरवी “अगं वैकुंठीचे राया” यांनी कार्यक्रमाची सांगता केली.
त्यांना तबल्यावर युवा आश्वासक कलाकार तेजोवृष जोशी आणि संवादिनीवर अनंत जोशी यांनी अप्रतिम साथ दिली.

🎤 संचालन व वातावरण

संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अॅड. अनघा नाईक-गोडबोले यांनी केले. त्यांच्या निवेदनाने कार्यक्रमाची रंगत अधिक खुलली.

🎼 उद्या रंगणार दुसरा दिवस

या महोत्सवाचा दुसरा दिवस रविवारी रंगणार असून पहिल्या सत्रात नुपूर चांदोरकर खटावकर आणि आर्या शेंदुर्णीकर या जळगावच्या युवा कलाकारांकडून गुरुवंदना आणि कथक नृत्य सादर होईल.
दुसऱ्या सत्रात अकादमीचे स्कॉलर अनुभव खामरू यांचे शास्त्रीय गायन होईल, तर समारोप सत्रात प्रख्यात बासरीवादक पं. रूपक कुलकर्णी आपल्या बासरीवादनाने रसिकांना संगीतसफरीवर घेऊन जातील.

संपूर्ण कार्यक्रम सर्व संगीतप्रेमींसाठी खुला असून, जळगावकरांनी या सुरेल पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक प्रतिष्ठान आणि आयटीसी संगीत रिसर्च अकादमीने केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने