Top News

जळगावात सोन्याच्या दुकानात चक्क लाखो रुपयांची चोरी!


महिलेने डोळ्यांसमोरच १ लाख ४० हजारांची अंगठी केली गायब

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील रिंगरोडवरील प्रसिद्ध पु. ना. गाडगीळ अँड सन्स लिमिटेड या सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानात चक्क एका महिलेने लाखों रुपयांची अंगठी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरी करणाऱ्या महिलेचा शोध पोलिस घेत आहेत.

घटनेचा तपशील असा —
दुकानातील मॅनेजर गिरीश दिवाकर डेरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुकानातील कर्मचारी सीमा सुर्वे ग्राहकांना अंगठ्या दाखवत असताना एका अंगठीबाबत संशय निर्माण झाला. तपासणीदरम्यान एक अंगठी डुप्लिकेट असल्याचे लक्षात आले. तत्काळ सर्व अंगठ्यांचे बारकोड स्कॅन करून तपासणी करण्यात आली असता, १०.७३० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी गायब असल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास एक महिला दुकानात अंगठ्या पाहत असताना खोटी अंगठी ठेवून खरी सोन्याची अंगठी घेऊन जाताना स्पष्टपणे दिसून आली. या अंगठीची किंमत तब्बल १ लाख ४० हजार रुपये इतकी आहे.

या प्रकरणी दुकान व्यवस्थापकांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित महिलेचा शोध सुरू आहे.

सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानात अशा प्रकारची चोरी घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये तसेच ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली असून, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने