जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देण्यासाठी आलेल्या शिक्षकाचा परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (२३ नोव्हेंबर) सकाळी घडली. संदीप प्रल्हाद पवार (वय ४२, मूळ रा. बिल्दी, ता. पाचोरा) असे मृत शिक्षकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोराहून टीईटी परीक्षा देण्यासाठी जळगावात आलेले संदीप पवार हे सकाळी मू.जे. महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रात जाण्यासाठी पोहोचले होते. दुचाकीने आल्यावर ते महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या दुकानात झेरॉक्स काढण्यासाठी गेले. याच दरम्यान त्यांना अचानक प्रकृती बिघडल्याचे जाणवले व काही क्षणांतच त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. घटनेनंतर उपस्थित सहकाऱ्यांनी तत्काळ त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या अचानक निधनाची बातमी समजताच परिसरात शोककळा पसरली. संदीप पवार हे पाचोरा तालुक्यातील लाखतांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी शिक्षण क्षेत्रात निष्ठेने सेवा बजावली होती. ते जुनी पेन्शन संघटनेचे विश्वस्त तसेच शिक्षक सेनेचे पाचोरा तालुकाध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या निधनामुळे शिक्षक व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. पवार यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. तरुण वयात अचानक कोसळलेल्या या शिक्षकाच्या निधनाने शिक्षकमहासंघातही स्तब्धता आणि दुःख व्यक्त केले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा