जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I मुक्ताईनगर शहरात रविवारी (२३ नोव्हेंबर) एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रकरणामुळे परिसरात तणाव आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत तरुणाचे नाव विशाल गणेशगीर गोसावी (वय २८, रा. जिजाऊनगर) असे आहे. गेल्या दोन दिवसांपासून तो बेपत्ता होता. रविवारी सायंकाळी हॉटेल वृंदावनसमोरच्या प्लॉटिंग भागात स्थानिकांना त्याचा मृतदेह आढळला. देहावर अनेक ठिकाणी चाकूचे घाव असल्याने खुनाची शक्यता अधोरेखित झाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलविला.
तपासादरम्यान ऋषिकेश आत्माराम पवार आणि आकाश आत्माराम पवार या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आकाश पवारचा अलीकडेच एका तरुणीसोबत साखरपुडा झाला होता. त्या तरुणीचे विशालसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय आकाशला होता. या संशयातून दोन्ही भावांनी कट रचून विशालला दारू पाजली आणि त्यानंतर बोदवड रस्त्यावरील बंद पडलेल्या उद्यानात नेऊन त्याची चाकूने हत्या केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा